आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:यापुढे कला, विज्ञान, वाणिज्य नव्हे; मानवता, सामाजिक विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम असतील दहावीनंतरच्या शाखा

जळगाव | धनश्री बागूल22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पुढे कला, वाणिज्य की विज्ञान शाखेत प्रवेश घेणार, हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आता बदलावा लागणार आहे. कारण उच्च माध्यमिक शिक्षणाच्या या तीन शाखा बदलून यापुढे मानवता (ह्युमॅनिटीज), सामाजिक विज्ञान आणि व्यावसायिक या तीन शाखांतून विद्यार्थ्यांना निवड करावी लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर आधारित राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ही बाब निश्चित करण्यात आली आहे. या तीनपैकी काेणत्याही दोन शाखांतले विषय एकाच वेळी निवडण्याची सवलतही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

आतापर्यंतची शैक्षणिक रचनेत शालेय स्तरावर इयत्तांनुसार तीन स्तर करण्यात आले होते. १६+१८ म्हणजे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचा एक स्तर आणि ११ वी व १२ वीचा दुसरा स्तर होता. पहिल्या स्तराची सुरुवात इयत्ता पहिलीपासून होत होती. आता याची रचना बदलण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या वयानुसार हे स्तर ठरवण्यात आले आहेत. त्याची सुरुवात बालवाडीपासून करण्यात आली आहे. वय वर्षे तीन ते सात म्हणजे नर्सरी, लोअर किंडर गार्टन (एलकेजी), किंडर गार्टन (केजी), पहिली आणि दुसरी असा पहिला स्तर असेल. दुसरा स्तर वय वर्षे आठ ते १० वर्षे म्हणजे तीन वर्षांचा, अर्थात पाचवीपर्यंतचा असेल.

तिसरा स्तर वय वर्षे ११ ते १३ म्हणजे इयत्ता सहावी, सातवी आणि आठवीचा असेल. चौथा स्तर वय वर्षे १४ ते १८ म्हणजे चार वर्षांचा (नववी ते १२ वी) असेल. म्हणून या रचनेची ५ + ३ + ३ + ४ अशी मांडणी करण्यात आली आहे. पहिला पाच वर्षांचा स्तर हा पायाभूत शिक्षणाचा असून, दुसरा तीन वर्षांचा स्तर प्राथमिक शिक्षणाचा आहे. या दोन्ही स्तरांचे शैक्षणिक आराखडे जाहीर करण्यात आले आहेत. पुढच्या दोन आराखड्यांची घोषणा वर्षभरात होईल, असा अंदाज आहे.

असा आहे नवीन बदल : दहावीला आधी पाच विषयांचा अभ्यास, नव्या शिफारशीत आठ विषय होऊ शकतात सक्तीचे
- नवीन आराखड्यात दहावी, अकरावी आणि बारावीला दुय्यम टप्प्यात ठेवून दोन भाग करण्यात आले आहेत. इयत्ता दहावी पूर्ण करण्‍यासाठी विद्यार्थ्यांनी नववी आणि इयत्ता दहावी या दोन वर्षांत एकूण आठ अभ्यासक्रमांपैकी प्रत्येकी दोन आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील.

- पूर्वी विद्यार्थ्याला विज्ञान शाखा घेतली तर सर्व विषय त्याचेच शिकावे लागत होते. मात्र नवीन धोरणानुसार विद्यार्थ्याला आता दोन शाखांचे शिक्षण सोबत घेता येणार आहे. ह्युमिनिटीजचे तीन विषय घेतल्यानंतर त्याला उर्वरित तीन विषय हे व्होकेशनल किंवा सामाजिक विज्ञान या शाखेतील घेण्याची मुभा असणार आहे.

- दहावीपर्यंत या सर्व विषयांचा अभ्यास झाल्यावर विद्यार्थ्याला इयत्ता अकरावीत तीन पर्याय मिळतील. पहिल्या पर्यायात मानविकी अर्थात ह्युमिनिटीज ही पहिली शाखा दिसेल. यात भाषा, साहित्य आणि तत्त्वज्ञानाचा समावेश असेल. दुसरी शाखा सामाजिक विज्ञान राहील. या शाखेत विज्ञान, गणित आणि संगणकीय विषय असतील तर तिसरी शाखा ही व्होकेशनल राहील. यात लेखन, क्रीडा आणि व्यावसायिक विषय निवडण्याचा पर्याय असेल.

- सध्या दहावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना किमान पाच विषयांचा अभ्यास करावा लागतो, मात्र नव्या शिफारशीत आठ विषय सक्तीचे केले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना इयत्ता नववीपासून आपल्या भविष्याची तयारी सुरू करावी लागेल. त्याला सर्व विषय शिकवले जातील, जेणेकरून बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे याचा गोंधळ होऊ नये.

आनंददायी शिक्षण देणारा आराखडा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचा शालेय शिक्षणाचा मसुदा नुकताच जाहीर झाला असून यात विद्यार्थ्यांना दर्जायुक्त व तणावविरहित किंबहुना आनंददायी शिक्षण देणे हाच उद्देश असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सोबतच भाषा व कला शिकणे, अध्यापनशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन, बोर्ड परीक्षेतील बदल यासह इतर अनेक विषय व बाबींचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. डॉ. जगदीश पाटील, शिक्षणतज्ज्ञ, जळगाव

अंगणवाडीचाही शालेय शिक्षणात समावेश
नवीन शैक्षणिक धोरणानुसार नर्सरी, एलकेजी, केजी हे शालेय शिक्षणाचा भाग असतील. पूर्वी यांचा समावेश शैक्षणिक धोरणात नव्हता. पहिल्या इयत्तेत विद्यार्थ्यांना पुस्तके पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहेत. पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी भाषा आणि गणित ही दोनच पुस्तके वाचतील. पहिली ते पाचवीपर्यंत औपचारिक परीक्षेऐवजी मूल्यांकन होईल.

दहावी, बारावीच्या मूल्यांकनातही बदल : राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा मसुद्याच्या अहवालानुसार दहावी व बारावीच्या अंतिम निकालात मागील इयत्तेच्या गुणांचे मूल्यमापन करून जोडता येईल. या आधारावर मुलांना परीक्षा देण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. जेव्हा विद्यार्थ्यांना आपला अभ्यास पूर्ण झाल्याची खात्री होईल तेव्हा ते परीक्षेची मागणी करू शकतील. त्यासाठी परीक्षा मंडळाला मोठ्या प्रमाणावर प्रश्नांची बँक तयार करावी लागेल. तसेच वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा देण्याची शिफारस केली आहे.