आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरीक्षार्थी विद्यार्थ्यांना बाहेरून काॅपी पुरवण्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्यामुळे राज्य परीक्षा मंडळ आधीच ‘नापास’ झालेले असताना आता तर थेट पर्यवेक्षकच दहावीच्या परीक्षार्थींना प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये चित्रित झाले आहे. यावल तालुक्यातील साकळी गावातील या परीक्षा केंद्रात सोमवारी पालक आणि काॅपी पुरवणाऱ्यांचा मुक्त संचारही तितक्याच स्पष्टपणे चित्रित झाला आहे.
साेमवारी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बीज गणित विषयाची परीक्षा होती. शहरी भागातील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक गंभीर प्रकार सुरू असल्याचेही ‘दिव्य मराठी’ने १२ वीच्या परीक्षांत दाखवून दिले होते. दहावीच्या परीक्षांतही असेच गैरप्रकार ग्रामीण भागात सुरू आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर साकळी त शारदा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्राला सोमवारी भेट दिली. तेव्हा हे गैरप्रकार समोर आले. ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी सकाळी १० वाजता केंद्रावर आले.
केंद्राच्या आवारात मुक्त संचार
परीक्षा केंद्राच्या परीसरात इतरांना प्रतिबंध करण्यात आला असला आणि तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला असला तरी या शाळेच्या आवारात मुले आणि पालकही परीक्षा काळात मुक्त संचार करीत होती. तसाच मुक्त संचार करीत थेट परीक्षा केंद्राच्या दाराशी जात चित्रिकरण करणे त्यामुळेच ‘दिव्य मराठी’ला शक्य झाले. त्यात मुक्तपणे इकडे तिकडे फिरणारे चित्रित झाले आहेत. अर्थात इथे काॅपीयुक्त वातावरण हाेते.
पर्यवेक्षक म्हणाले, टेन्शन नाही
बाहेरून आलेल्या एका मुलाने एका पर्यवेक्षकाला प्रश्नपत्रिकेचा फोटो मोबाईलमध्ये काढू देण्याची विनंती केली. त्यावर ते पर्यवेक्षक म्हणाले, ‘‘प्रश्नपत्रिकेचा फोटो घेऊन काय करशाल. अपेक्षितमध्ये काहीच नाही. मी स्वत: पाहतोय (शोधतोय). सर्वांना उत्तरे येताय. तुमच्या फोटोसाठी या सर्वांचे नुकसान करू नका. इथे काही टेन्शन नाही. सगळं भेटतं मधे. उलट कोणाच काही राहिलं असेल तर आम्हीच विचारून घेतो.
पर्यवेक्षकच जेव्हा ‘गाइड’ बनतात
त्या शाळेत १० वीची परीक्षा सुरू आहे असे कोणतेही लक्षण दिसत नव्हते. वर्गखोल्यांच्या खिडक्यां- भोवती मुलांचे कोंडाळे परीक्षा सुरू होऊन संपेपर्यंत उभे होते. कोणी बाहेरून गणिते सोडवून आणलेले कागद आत देत होते तर कोणी काॅपी करताना धीर देण्याचे काम करीत होते. त्यामुळे छुप्या कॅमेऱ्यासह ‘दिव्य मराठी’ टीमनेही त्या खिडक्या गाठून डोकावले तेव्हा वर्गातील पर्यवेक्षकच प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सांगत होते. त्यांच्या आवाजासह तो सर्व प्रकार चित्रित झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.