आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचा निर्णय:आता घरी बसूनच ऑनलाइन पेपर तपासणी करता येणार प्राध्यापकांना;परीक्षांचे निकाल मुदतीच्या आधी लागण्यास होईल मदत

जळगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. बी.व्होक, बी.एस.डब्ल्यू. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वगळता इतर सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने ऑन स्क्रीन डिजिटल इव्हॅल्युशन सिस्टिम या संगणकीय प्रणालीद्वारे त्या-त्या महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. या नवीन सिस्टिमद्वारे दिवसाला ४० हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग विद्यापीठ करणार आहे. या निर्णयामुळे मूल्यांकनात अधिक पारदर्शीपणा येईल. गुणपडताळणी व फेरमूल्यांकनासाठी लागणारा वेळ कमी होणे शक्य आहे.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक झाली. यात नवीन पद्धतीनुसार परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका जमा करून त्या विद्यापीठात जमा केल्या जातील. या ठिकाणी मशीनद्वारे उत्तरपत्रिकेच्या प्रत्येक पानाचे स्कॅनिंग केले जाईल. दिवसाला ४० हजार उत्तरपत्रिका स्कॅनिंग केल्यानंतर अपलोड केल्या जाणार आहेत. अपलोड केलेल्या उत्तरपत्रिका प्राध्यापकाच्या लॉगिनवर तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्राध्यापकाला महाविद्यालय, विद्यापीठात पेपर तपासणीसाठी येण्याची गरज भासणार नाही. घरी बसून ऑनलाइन पेपर तपासणी करता येणार आहे.

उत्तरपत्रिका स्कॅनिंग होणार असल्याने गुणपडताळणी व फेरमूल्यांकनासाठीचा लागणारा वेळ कमी होईल. तसेच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्सची मागणी विद्यार्थ्याने केल्यास त्याच्या मेलवर तातडीने उत्तरपत्रिका पाठवली जाणार आहे. याशिवाय परीक्षांचे निकाल मुदतीच्या आधी लागण्यास मदत होईल.

प्रथम वर्षाची तपासणी महाविद्यालयात
प्रथम वर्ष बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, बी.व्होक, बी.एस. डब्ल्यू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वगळता इतर सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर करण्याचा निर्णय परीक्षा. मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. द्वितीय व तृतीय वर्षाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी विद्यापीठात होणार आहे. त्यामुळे वेळेतही बचत हाेणे शक्य आहे.

आता घरूनही करता येणार पेपर सेटिंग
पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकांचे सेटिंग व वितरण महाविद्यालयांना आॅनलाइन हाेईल. त्यामुळे प्रश्नपत्रिका सेटिंग व वितरणासाठी कालावधी कमी लागणार असला तरी तंत्रज्ञान वापरल्याने खर्च वाढेल. तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याने हा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे, अशी माहिती प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी दिली.