आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंदी असलेला नायलॉन मांजा हरीविठ्ठलनगरमध्ये विक्री होत असल्याचे स्टींग ऑपरेशन ‘दिव्य मराठी’ने केले. त्यानंतर गुरूवारी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी हरीविठ्ठलगरातूनच मांजा विक्रेत्यांची जनजागृती सुरू केली आहे. पंतग, मांजा विक्रेत्यांना भेटून नायलॉन, चायना मांजामुळे पक्ष्यांचा जीव धाेक्यात आला आहे.
यासह दुष्परिणाम काय आहेत याची माहिती देण्यात येत आहे. तसेच या कालावधीत जनतेने काय काळजी घ्यायला हवी याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. मोहिमेत संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, योगेश गालफाडे, जगदीश बैरागी, राहुल सोनवणे, राजेश सोनवणे, नीलेश ढाके, रवींद्र भोई, कृष्णा दुर्गे, प्रसाद सोनवणे , चेतन भावसार, पंकज सुर्यवंशी, अरुण सपकाळे, फ्रेंडस ऑफ अॅनिमलचे योगेश वानखेडे हे सहभागी झाले आहेत.
कृतीदल स्थापन करुन कारवाई करा : नायलॉन मांजा उत्पादन, साठवणूक, विक्री व मांजा बाळगणे याविरोधात कृतिदल स्थापन करण्याची मागणी निसर्गमित्रतर्फे पक्षिमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या वेळी नायलॉन मांजा उत्पादन, साठवणूक, विक्री व मांजा बाळगणाऱ्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गाडगीळ यांनी केली आहे.
नागरिकांनो अशी घ्या काळजी
पतंगोत्सव काळात मोटारसायकलवर वावरताना गळ्यात मफलर किंवा रुमाल बांधा. मुलांना नायलॉन मांजा वापरू देऊ नका, पतंग उडवताना हातात हातमोजे वापरा. शहरात कुठेही चायना, नायलॉन मांजा विक्री होत असल्यास बंदी बाबत संबधितांच्या लक्षात आणून द्या. तसेच दुष्परिणामाची माहिती द्या. नायलॉन मांजा विक्रेत्यांची माहिती पोलिस ठाणे, मनपा, वन्यजीव संस्थेस कळवा. मांजामुळे जखमी झालेले पक्षी आढळून आल्यास वन विभाग हेल्पलाईनच्या १९२६ या क्रमांकावर फोन करा किंवा पक्षीमित्रांना बोलवा. पक्ष्यांचे जीव वाचवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.