आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोखठोक:हे राजकीय ढोंग आवरा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुषमा अंधारे यांच्या प्रबाेधन यात्रेच्या निमित्ताने जे काही घडते आहे तेच राजकारण आहे का? राजकीय भूमिका बदलली म्हणून लहान-मोठ्याचा मुलाहिजा न ठेवता कोणाचा तरी शिवराळ भाषेत जाहीर ‘उद्धार’ करणे, एकमेकांना धमक्या देणे, कोणी टीका केली म्हणून सत्तेचा वापर करीत अटक करून धडा शिकवणे म्हणजे राजकारण आहे, हाच धडा घ्यायचा का नव्या पिढीने? हेच आमचे आजचे आणि उद्याचे नेते आहेत असे आम्ही मानायचे का? यांच्या भरवशावर आम्ही आमचे शहर, आमचा जिल्हा विकसित होईल, त्याबरोबर आमचीही प्रगती होईल, असा विचार करून पुढे जात राहायचे? या राजकारणात कुठे आहे जळगावचा विकास? कुठे आहे जळगावातील ‘नाही रे’ वर्गातील माणसाचा विकास? इथे पक्ष सोडला म्हणून गद्दार ठरणारे किंवा एखाद्या धर्माला तिलांजली दिली म्हणून पक्ष सोडणारे एकमेकांची बाजू मांडताहेत. त्यातला कोण समाजातल्या तळागाळातल्या, वंचीत, दलित, मागास माणसाची बाजू घेऊन बोलतो आहे? माध्यमांचीही हतबलता अशी की, त्यांनाच भरभरून प्रसिद्धी द्यावी लागते आहे.

संपादक म्हणून त्याची लाज मला तरी वाटते आहे. हेच राजकारण असेल तर कशाला हवे हे राजकारण? आणि हीच पत्रकारीता करायची असेल तर कशाला करायची असली पत्रकारिता, असा प्रश्न मला तर नक्कीच पडला आहे. हे थांबले पाहिजे. भावनेच्या भरात नेत्यांच्या मागे धावणाऱ्या पिढीशी ही प्रतारणा आहे. त्यांच्याशी ही गद्दारी आहे. त्यांची फसवणूक आहे. ही थांबली पाहिजे. ज्यांना प्रबोधन यात्रा काढून खरोखरच प्रबोधन करायचे आहे त्यांनी ते प्रामाणिकपणे करावे. प्रबोधनाच्या पडद्याआड राजकारणाचे प्रयोग करू नयेत, एवढीच अपेक्षा आहे.

दीपक पटवे, निवासी संपादक,जळगाव

बातम्या आणखी आहेत...