आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आठ दिवसांत 19 ठिकाणी निरीक्षण; केवळ दीड हजार चिमण्या आढळल्या ; संख्येत तब्बल 60 टक्क्यांनी घट

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वन्यजीव संरक्षण संस्थेचा उपक्रम; कृत्रिम घरटी तयार करण्यासाठी प्रबाेधन करणार

जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी शहर व परिसरात गेल्या आठ दिवसांपासून चिमण्यांचे निरीक्षण केले. १९ ठिकाणी केलेल्या निरीक्षणात केवळ १,५२० चिमण्या आढळल्या. वाढत्या शहरीकरणाने चिमण्यांच्या संख्येत घट झाल्याचा निष्कर्ष समोर आला.

अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता दिसेनाशी झाली आहे. मोकळ्या जागा, माळरानावर मानवी वसाहती झाल्याने चिमण्यांचा अधिवास धोक्यात आहे. गेल्या आठ दिवसांपासून वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी वेगवेगळ्या परिसरांत निरीक्षण केले. सावखेडारोड परिसरात सर्वाधिक १६०, आसोदारोड परिसरात १५० चिमण्या आढळल्या. इतर ठिकाणची परिस्थिती समाधानकारक जाणवली नाही. मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांच्या नेतृत्वात पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, दुर्गेश आंबेकर, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, नीलेश ढाके, ऋषी राजपूत, चेतन भावसार, अरुण सपकाळे, अजीम काझी, कृष्णा दुर्गे, स्कायलेब डिसुझा, अमन गुजर, वासुदेव वाढे, हेमराज सोनवणे, दिनेश सपकाळे यांनी या निरीक्षणात सहभाग नोंदवला.

संवर्धनाचे मोठे आव्हान
घरासमोर झुडूपवर्गीय झाडांचे रोपण, बांधावर बोरी, बाभूळ लागवड करावी. गच्चीवर, गॅलरीत कृत्रिम घरटी, घरावर धान्य, पाणी ठेवून चिमण्यांची संख्या वाढीस लागू शकते, असे मत रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे यांनी व्यक्त केले.

विद्यापीठ परिसरात आहे पोषक वातावरण
महाराष्ट्रात घर चिमणी (हाऊस स्पॅरो) हा एकमेव चिमणीचा प्रकार आढळतो. चिमण्यांची संख्या पूर्वीपेक्षा ६० टक्के कमी झाली आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. चिमण्यांना पोषक वातावरण, अन्न, पाणी मिळते त्या वातावरणात त्या राहत आहेत. शहरात चिमणी दुर्मीळ झाली.

निरीक्षणाचे ठिकाण आणि कंसात चिमण्या
विद्यापीठ परिसर १२०, आशाबाबानगर ३८, ममुराबादरोड ५६, कानळदारोड १०२, निमखेडीरोड ७९, हरिविठ्ठलनगर २४, कोल्हे हिल्स परिसर १३२, सावखेडारोड १६०, गिरणा पंपिंग ७४, शिरसोलीरोड ८७, मेहरूण तलाव ३४, मन्यारखेडे तलाव परिसर ९२, दूध फेडरेशन परिसर १२२, पिंप्राळारोड ३४, म्हाडा कॉलनी ८०, शिव कॉलनी ६०, श्‍यामराव नगर २०, गोलाणी मार्केट तळघर ५६, आसोदारोड १५०.

बातम्या आणखी आहेत...