आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीच्या बागाही जंगल म्हणून मोजले:जळगावमध्ये 267 हेक्टरवर वृक्ष लागवड, केंद्राच्या अहवालात मात्र 591 हेक्टरची वाढ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक वनीकरण विभागाच्या आकडेवारीनुसार २०२०- २१ या वर्षात जिल्ह्यात २६७ हेक्टर जमिनीवर एक लाख ३८ हजार ३२५ झाडे लावण्यात आली. मात्र, केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात तब्बल ५९१ हेक्टर वनक्षेत्र वाढल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील केळीच्या बागांमुळे हिरवे दिसणारे क्षेत्र उपग्रहाने वनक्षेत्रात मोजल्यामुळे ही वाढ झाली असावी, असे मत वन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांनी नुकताच भारतीय वन सर्वेक्षण संस्थेद्वारे तयार करण्यात आलेला ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२१’ जाहीर केला आहे. त्यात २०२१ मध्ये उपग्रहाद्वारे करण्यात आलेल्या वनांच्या सर्वेक्षणाचा तपशील दिला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षी ५९१ हेक्टर वनक्षेत्र वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात सामाजिक वनीकरण विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार या वर्षी जिल्ह्यात एक लाख ४५,९१० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट होते. त्यापैकी एक लाख ३८,३२५ झाडांची लागवड करण्यात आली. ही लागवड मोकळी जागा आणि महामार्गांच्या दुतर्फा करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण २६७.१० हेक्टर जमीन व्यापली गेली आहे, असे सामाजिक वनीकरण विभागाचे म्हणणे आहे.

४४ हजार हेक्टर केळी शेतात

जळगाव जिल्हा केळी लागवडीत अग्रेसर आहे. जिल्ह्यात सन २०२१ मध्ये साधारण ४४ हजार हेक्टर क्षेत्रात केळी उभी होती. हे केळी लागवड क्षेत्र शेजारी शेजारी असल्यामुळे उंचावरूनही मोठे क्षेत्र हिरवेगार दिसते. त्याचा परिणाम उपग्रहाद्वारे सर्वेक्षणावर झाला असेल आणि जिल्ह्यातील वनक्षेत्र त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत असेल, असे मत वन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

तब्बल ३२३ हेक्टर वनक्षेत्र अधिक

वन विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार २६७.१० हेक्टरवर झाडांची लागवड करण्यात आली असली तर सार्वजनिक जागेवरील वृक्षलागवड यशस्वी होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतकेच असते. त्यामुळे प्रत्यक्षात वनक्षेत्रातील वाढ त्यापेक्षाही कमीच मोजली जायला हवी होती. तरीही ३२४ हेक्टर अधिक वनक्षेत्र दिसत असल्यामुळे त्यात केळीच्या बागांची काही प्रमाणात गणती झाली असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...