आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ:दीपनगर केंद्रात एकाच दिवसाचा कोळसा शिल्लक; दररोज मिळणाऱ्या कोळशावर वीजनिर्मितीची मदार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल फील्डमध्ये पावसाचे पाणी शिरून उत्पादन कमी झाले. यामुळे महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांना पुरेसा कोळसा पुरवण्यात अडचणी येत आहेत. ही स्थिती पाहता दीपनगर केंद्रात किमान १४ दिवसांचा कोळसा साठा शिल्लक असणे अपेक्षित आहे. पण, पुरवठाच कमी असल्याने केंद्रात केवळ एक दिवस पुरेल एवढा म्हणजे १६ हजार टन कोळसा शिल्लक आहे. तूर्त दररोज गरजेनुसार कोळसा उपलब्ध होत असल्याने वीज निर्मितीवर परिणाम नाही. पण, एक दिवसही पुरवठा विस्कळीत झाल्यास दीपनगर केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प होऊ शकते.

गेल्या पंधरवड्यात राज्यभरात जोरदार पाऊस झाला. यामुळे राज्यातील महानिर्मितीच्या औष्णिक केंद्रांना कोळशाचा पुरवठा करणाऱ्या विदर्भातील बहुतांश कोळसा खाणींमध्ये पाणी शिरले. परिणामी, कोळसा उत्पादनात घट झाली. यामुळे सध्या राज्यभरातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आपत्कालीन स्थितीत दीपनगर औष्णिक केंद्रात सुमारे १४ दिवसांचा म्हणजेच सव्वादोन लाख मेट्रिक टन कोळसा साठा असणे अपेक्षित आहे. पण, केंद्रात केवळ १ दिवसाचा १६ हजार टन साठा शिल्लक आहे. असे असले तरी दररोज किमान तीन ते चार रॅक कोळसा उपलब्ध होत असल्याने तूर्त वीज निर्मितीवर परिणाम नाही. मात्र, आगामी काळात दररोज कोळसा उपलब्ध होण्यात अडचणी आल्या तर औष्णिक केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प होण्याची भीती आहे. शिवाय सध्या मिळणारा कोळसा काही प्रमाणात ओला असतो. त्यामुळे आयात कोळशाचा वापर करावा लागत आहे. दरम्यान, प्रत्येक केंद्रात किमान आठ दिवसांचा कोळसा साठा असावा यासाठी महानिर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत.

वीजनिर्मितीवर परिणाम नाही...
वीज प्रकल्पात १४ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा असेल तर ती चांगली स्थिती मानली जाते. मात्र, सध्या केवळ एक दिवस पुरेल एवढाच साठा आहे. महानिर्मितीच्या मुख्यालयातून हा साठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दररोज किमान तीन ते चार रॅक कोळसा मिळत असल्याने सध्या वीज निर्मितीवर परिणाम नाही. दीपनगर केंद्रातून ८० टक्के पीएलएफने वीजनिर्मिती होत आहे. - विजय राठोड, मुख्य अभियंता, दीपनगर औष्णिक केंद्र, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...