आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार:एका लॅबने ठरवले काेराेना पॉझिटिव्ह, दुसरीने निगेटिव्ह; आ. दराडेंसह कुटुंबाला मनस्ताप

येवला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिक्षक आमदार किशोर दराडे. समवेत डॉ. सुधीर जाधव, देविदास निकम.
  • नाशकात शरद पवारांकडे आज करणार तक्रार

शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांना एका खासगी लॅबने कोरोना पॉझिटिव्ह ठरवल्यावर दोन दिवसांत मुंबईतील लॅबने निगेटिव्ह ठरवले आहे. यानंतर त्यांच्या कुटुंबीयातील नऊ सदस्यांच्या बाबतीतही असाच प्रकार झाल्याने त्यांचे भाऊ आमदार किशोर दराडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मेलद्वारे लेखी तक्रार केली असून शुक्रवार, २४ रोजी शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे लॅबच्या चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती आमदार दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना पॉझिटिव्हचा मोठा मनस्ताप आमदार नरेंद्र दराडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना गेल्या चार दिवसांत झाला आहे.

आमदार नरेंद्र दराडे ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या तसेच नातेवाइकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे लक्षणे नसतानाही शंका म्हणून त्यांनी पुणे येथील कृष्णा डायग्नाेस्टिक या लॅबमध्ये स्वॅब देऊन तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. विशेष म्हणजे संपर्कातील संपूर्ण कुटुंबच निगेटिव्ह आले. अहवाल पॉझिटिव्ह येताच दराडे तातडीने मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. परंतु, तेथील डॉक्टरांनीही पुन्हा स्वॅब घेण्याचा निर्णय घेतला असता दुसऱ्या दिवशी दराडे निगेटिव्ह असल्याचा अहवाल आला. यादरम्यान शिक्षक आमदार किशोर दराडेंसह संपर्कातील व कुटुंबातील २२ जणांचे आरोग्य विभागामार्फत स्वॅब पाठवण्यात आले. रविवारी स्वॅब घेतल्यावर मंगळवारी दुपारी यातील दराडे कुटुंबातील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, एकालाही लक्षणे नसल्याने व आमदार दराडे यांच्या अहवालातील गोंधळ पाहता दराडे कुटुंबात तीन डॉक्टर असल्याने त्यांच्या सल्ल्यानुसार सेकंड ओपिनियन म्हणून मुंबईतील थायराेकेअर या लॅबची टीम येवल्यात बोलावून या नऊ जणांचे स्वॅब पुन्हा देण्यात आले. याचा अहवाल गुरुवारी सकाळीच प्राप्त झाला असून सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. शिवाय गुरुवारी पुन्हा सर्वांच्या रॅपिड टेस्टदेखील निगेटिव्ह आल्या आहेत. स्वॅब व उपचाराच्या प्रक्रियेत दोन ते अडीच लाखांचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागला आहे.

लॅबच्या अहवालामुळे गोंधळ वाढून मनस्ताप

आजार नसताना लॅबच्या अहवालामुळे गोंधळ वाढून मनस्ताप होत आहे. आमचे संपूर्ण कुटुंब गेल्या पाच दिवसांपासून प्रचंड मनस्ताप सहन करत आहे. आता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असला तरी या अहवालांच्या पॉझिटिव्ह-निगेटिव्हमुळे अनेक शंका निर्माण होत आहे. यासंदर्भात मी स्वतः आरोग्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. - नरेंद्र दराडे, आमदार