आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकौटुंबिक हिंसाचार प्रकरणात महिलांना सहाय्य करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींत कोरोनानंतर तब्बल ५० टक्केपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. कोरोनापूर्वी दरमहा सरासरी १०० तक्रारी येत होत्या. त्या २०२१मध्ये १५० आणि २०२२च्या पाच महिन्यात सरासरी १६४पर्यंत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे या कक्षाकडे तक्रारी करणाऱ्यांत पुरुषही असून साधारण १५ ते १६ टक्के तक्रारी पुरूष करीत आहेत. महिलांवरील अत्याचारांकडे विशेष लक्ष देऊन ते कमी करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. त्यानुसार राज्यात ९७५ पोलिस ठाण्यांमध्ये महिला सहायता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात महिलांना पोलिसांचा आधार मिळावा यासाठी हे कक्ष काम करतात. जळगाव जिल्ह्यात या सहायता कक्षाकडे विवाहित पुरुषांनी तक्रारी करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. गेल्या पाच वर्षांत या कक्षाकडे तक्रार करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण १५ ते १६ टक्के राहिले आहे. त्यातील साधारण चार ते पाच टक्के तक्रारी या पत्नीच्या तक्रारीवरून आपल्यावर कारवाई होऊ नये याची दक्षता म्हणून दाखल केलेल्या असतात, असाही आतापर्यंतच्या तपासाचा निष्कर्ष समोर आलेला आहे. नोकरी त्याचप्रमाणे व्यवसाय करणारे पुरूष कोरोना काळात अनेक महिने घरातच बसून होते. विशेषत: जे घरून काम करू शकत होते (वर्क फ्रॉम होम) अशा नोकरदार महिला आणि पुरूषांचे घरातील वास्तव्य वाढले होते. त्यातून त्यांच्यामध्ये वाद वाढत गेले, असा प्रकार सर्वत्रच समोर आला आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात या वादाचे प्रमाण काहीसे अधिक असल्याचे चित्र दिसून येत असून महिला सहायता कक्षाकडे येणाऱ्या तक्रारीत त्यामुळे मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे एकूण पोलिसांच्या तसेच सहायता केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कामाचा भार माेठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. पंधरा टक्के तक्रारी पत्नीविरुद्धच : जळगाव जिल्ह्यासाठी असलेल्या सहायता केंद्राकडे येणाऱ्या तक्रारीत १०० पैकी १५ ते १६ तक्रारी या पुरुषांनी पत्नीविरूद्ध केलेल्या असतात, असे आकडेवारी सांगते. कोरोनानंतर महिलांच्या तक्रारीत ५० ते ६० टक्के वाढ झाली असतानाच पुरूषांच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पुरूषांच्या तक्रारीचे प्रमाण २०२२च्या पाच महिन्यात १७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या तक्रारींनंतर समुपदेशन करण्याचे काम सहायता कक्षातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी करतात. त्यात पुरूषांनी पत्नीविरोधात केलेल्या तक्रारीत साधारण ६० टक्के वेळा समेट घडून येते, असेही जळगाव जिल्ह्याचे चित्र आहे. महिलांच्या तक्रारीच्या बाबतीत हे प्रमाण कमी आहे. समुपदेशनानंतर समेट घडून आली नाही तर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची शिफारस देखील केली जाते. सध्या या कक्षासाठी रत्ना मराठे, रुपाली खरे, संगीता पवार, रजनी माळी व ज्योती पाटील ह्या कर्मचारी काम करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.