आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील रस्त्यांची वाट बिकट:सहा महिन्यांत 26 रस्त्यांचे फक्त डांबरीकरण‎, एकही रस्ता पूर्ण नाही; आता 30 दिवसच संधी‎

प्रतिनिधी | जळगाव‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील दूध फेडरेशन ते शिवाजीनगर रस्त्याचे अपूर्ण असलेले काम.‎ - Divya Marathi
शहरातील दूध फेडरेशन ते शिवाजीनगर रस्त्याचे अपूर्ण असलेले काम.‎

राज्य सरकारने दिलेल्या ३८ कोटी‎ रुपयांच्या निधीतून शहरात ४९‎ रस्त्यांची कामे करायची होती; पण प्रशासनाचा भोंगळ कारभार, ‎लोकप्रतिनिधींचे सायीस्कर दुर्लक्ष‎ आणि ठेकेदाराची मनमानी यामुळे पावसाळा दारात येऊन ठेपला‎ असताना एकही रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही. २६ रस्त्यांचे‎ डांबरीकरण झाल्याचा दावा‎ करण्यात येत असला तरी त्यावर सिलकोट म्हणजे शेवटचा थर मात्र दिलेला नाही.

आणखी काही‎ रस्त्यांचे डांबरीकरण करून एकूण‎ ३५ रस्त्यांच्या सिलकोटचे काम एक महिन्यात पूर्ण करण्याचे आव्हान या‎ सर्व यंत्रणांसमोर आहे.‎ गेल्या अनेक वर्षांपासून शहरात रस्त्यांची कामे झालेली नव्हती.‎ त्यामुळे शहरातील रस्ते ही एक संशोधनाची बाब बनली होती. दिव्य मराठीने मागच्या वर्षी प्रत्येक‎ प्रभागात घेतलेल्या रुबरू‎ कार्यक्रमात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून ‘पावसाळ्यानंतर’ रस्ते चकाचक होतील असे‎ आश्वासन तोंडभरून दिले जात होते. तो‎ पावसाळा संपला आणि आता पुढचा पावसाळा‎ एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. तरी काही‎ रस्त्यांच्या अर्धवट कामावरच जळगावकरांना‎ समाधान मानावे लागते आहे. महापालिका‎ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि तो‎ विभाग महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे‎ वारंवार रस्त्यांवर होणाऱ्या खोदकामाकडे बोट‎ दाखवत असल्यामुळे ठेकेदाराला आपल्या‎ सोयीने काम करण्याची संधी मिळते आहे.‎

सिलकोट एकदम करण्याचा अट्टाहास‎

दिवाळीनंतर कामाचा आदेश मिळालेल्या‎ ठेकेदाराने शहरातील २६ रस्त्यांवर खडी आणि‎ डांबर टाकून रस्ते बनवल्याचे देखावे तयार‎ करून ठेवले आहेत. ३५ रस्ते पूर्ण झाल्यानंतरच‎ त्यावर एकाच वेळी सिलकोट करण्याचा‎ हट्टाग्रह ठेकेदाराकडून सुरू आहे. सिलकोट न‎ झालेल्या डांबरी रस्त्यांवर पावसाचे अथवा‎ कोणतेही पाणी पडले तर रस्त्याचे आयुष्य कमी‎ होते हे बांधकाम शास्त्र जाणणारे तज्ञ सांगतात.‎ हवामान खात्याने जोरदार पावसाचे पूर्व ईशारे‎ दिले तरी ठेकेदाराने मिळालेल्या वेळेत‎ सिलकोट करण्याचा प्रयत्नही केला नाही.‎ त्यासाठी ठेकेदारावर दबाव आणण्याची हिम्मत‎ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित‎ अभियंत्यांनी दाखवली नाही. दोन-तीनदा‎ जोरदार पाऊस झाल्यामुळे त्या रस्त्यांच्या‎ आयुष्याचे काय झाले, हे त्यांना आणि‎ ठेकेदारालाच माहिती.‎

काँक्रीटीकरणासाठी तीन‎ कामे थांबवण्यात आली‎

३८ कोटीतून दूध फेडरेशन ते‎ शिवाजीनगर उड्डाणपूल, मोहाडी‎ फाटा ते लांडोरखोरी रस्ता व जि.प.‎ चौक ते नेरीनाका स्मशानभूमी या‎ तीन कामांना पीडब्लूडीकडून‎ स्थगिती देण्यात आली आहे. यामागे‎ हे तीनही रस्ते काँक्रीटचे करायचे‎ असे प्रशासनाचे नियोजन आहे.‎ परंतु दूध फेडरेशन रस्त्याचे‎ एमपीएमचे काम पूर्ण झाले आहे.‎ बीएमचे काम करण्यास पीडब्लूडीने‎ ब्रेक लावला आहे. त्यामुळे हा रस्ता‎ पूर्वीपेक्षाही गैरसोयीचा होऊन पडला‎ आहे. अकरा रस्ते असे आहेत की‎ अजुनही त्या भागातून खड्ड्यातून‎ प्रवास करावा लागतो. भोईटे नगर ते‎ पिंप्राळा चौक हा रस्ता खराब आहे.‎ मेहरूण रस्त्याचीही अवस्था काही‎ वेगळी नाही. या रस्त्यांची कामे‎ आता दिवाळीनंतरच होऊ शकतील.‎

सात रस्त्यांवरून करावा लागतोय खडतर प्रवास‎

मक्तेदाराने ख्वाजामीयॉ युनिटी चेंबरचा रस्ता, बजरंग बोगदा ते सुरत‎ रेल्वेगेटपर्यंतचा रस्ता, एसएमआयटी कॉलेज ते यश लॉनपर्यंतचा रस्ता,‎ महाबळ चौक ते देवेंद्रनगर रस्ता, कासमवाडी ते महामार्ग, सारा हॉस्पिटल‎ ते संतोषी माता मंदिर ते महामार्ग या रस्त्यांचे एमपीएम अर्थात खडीकरण‎ व डांबरीकरण झाले आहे. यामुळे रस्त्याला खडी व डांबर लागले असले‎ तरी रस्ता खडतर आहे. बरेच दिवस उलटूनही बीएमचे काम झालेले नाही.‎

बीएम केलेल्या रस्त्यांवर‎ केले जातेय खोदकाम‎

मक्तेदार व सार्वजनिक बांधकाम‎ विभागाच्या सुत्रांच्या म्हणण्यानुसार‎ डब्लूबीएम, एमपीएम व बीएम‎ झालेल्या अनेक रस्त्यांवर अमृत‎ अंतर्गत जलवाहिनी टाकणे अथवा‎ नळजोडणीसाठी तसेच गळतीमुळे‎ खोदकाम करावे लागले. आतापर्यंत‎ सहा महिन्यात ५८पेक्षा जास्त‎ ठिकाणी खोदकाम झाले. अशा‎ रस्त्यांवर पुन्हा त्याच पध्दतीने काम‎ करावे लागले आहेत. महापालिका‎ प्रशाससाने नाहरकत दिल्यानंतरही‎ वारंवार खोदकाम होत असल्याने‎ रस्त्यांच्या कामांना विलंब झाल्याचा‎ दावा केला आहे. दरम्यान, पाव‎ साळा सुरू होण्यापूर्वी ३५ रस्त्यांचे‎ कारपेट आणि सिलकोट करून‎ शंभर टक्के काम पूर्ण केले जाईल,‎ असा दावाही मक्तेदार आदित्य‎ खटोड यांनी केला आहे.‎