आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण:शहरात उघडे फ्यूज बॉक्स, वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या वीजतारा बनल्या ‘यमदूत’ ; समस्यांकडे होतोय कानाडोळा

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीतर्फे शहरात सर्वत्र मान्सूनपूर्व कामे करण्यात येत आहे. ही कामे करताना मात्र उघडे फ्यूज बॉक्स, वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या वीज तारा या समस्यांकडे सोईस्कर कानाडोळा केला जात आहे. या समस्याही पावसाळ्यात जीवघेण्या ठरू शकतात. त्यामुळे महावितरणने पावसाळ्यापूर्वी उघडे फ्यूज बॉक्सला कुलूप लावावे, वाकलेले खांब सरळ करण्याची व्यवस्था करावी तसेच लोंबकळणाऱ्या वीज तारांना ताण देऊन ही समस्या सोडवणे गरजेचे झाले आहे. शहरात महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरच्या खाली बसवण्यात आलेल्या अनेक फ्यूज बॉक्सची अवस्था ही बिकट झाली आहे. अनेक फ्यूज बॉक्समधील कटाऊट हे तुटलेले आहे. त्यामुळे वीज कर्मचारी त्या कटाऊटमध्ये फ्यूज तार टाकून काम धकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर शहरात अनेक ठिकाणी फ्यूज बॉक्सला कुलूपच लावण्यात आलेले नसल्याने ते उघडे आहे तर काहींना तारांनी बांधण्यात आले आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळताना शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक कॉलन्यांमध्ये तर वीज गेल्यानंतर वेळेवर वीज कर्मचारी न आल्याने उघड्या फ्यूज बॉक्समध्ये नागरिक स्वत:च जीव धोक्यात घालून फ्यूज टाकत असतात. तसेच शहरात अनेक ठिकाणी काही वर्षांपासून खांब हे वाकलेले आहेत. पावसाळ्यात हे खांब कोसळून बऱ्याचदा दुर्घटनादेखील झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी असे धोकेदायक खांब सरळ करणे किंवा बदलवण्याची गरज आहे. अनेक भागात वीजवाहिन्याही लोंबकळत आहे. इमारतीपासून हातभराच्या अंतरावर त्या लटकलेल्या असून, पावसाळ्यात त्याही जीवघेण्या ठरणार आहेत. त्यामुळे महावितरण प्रशासनाने मान्सूनपूर्वची कामे करताना ही कामेदेखील प्राधान्याने करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दोघांचा झाला होता मृत्यू... दोन वर्षांपूर्वी मेहरूणमधील शेरा चौकात पावसाळ्याच्या दिवसांत ११ केव्हीच्या हायहोल्टेज वीज तारा कोसळून दोघांचा मृत झाला होता. त्यामुळे रहिवासी भागातील हायहोल्टेज वीज तारांना संरक्षण आवरण बसवण्याची गरज आहे. तसेच या तारांना संरक्षण आवरण बसवण्याबाबतही या परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना अनेक वेळा निवेदनही दिले आहे; पण समस्या सुटलेली नाही. तसेच मेहरूण शिवारातील अनेक भागात ११ केव्हीची हायटेन्शन व्होल्टेजच्या वीज तारा गेल्या आहेत. या वीज तारांना संरक्षण आवरण बसवण्याची मागणी मेहरूणमधील याकूब मुलतानी, खालीद मोहंमद, साजीद शेख आदींनी महावितरणच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शहरात येथे आहे जीवघेणी स्थिती शाहूनगर परिसर, गोविंदा रिक्षा स्टॉप परिसर, शिवतीर्थ रोड, स्टेट बँक मुख्य शाखा, पांडे डेअरी चौक, तुकारामवाडी परिसर, तरुण कुढापा चौक, फुले मार्केट, पिंप्राळा रोड, हरिविठ्ठलनगर, खंडेरावनगर, रामानंदनगर, आर.आर. शाळा परिसर, एमआयडीसी, अयोध्यानगर, लक्ष्मीनगर, गेंदालाल मिल, हुडको, शिवाजीनगर, जिल्हा रुग्णालय परिसर, मेहरूण, नेरी नाका, कालिंका माता मंदिर, खोटेनगर परिसरात उघडे फ्यूज बॉक्स दिसून येत आहे. तर शिवतीर्थ मैदान, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, चित्रा चौकसह शहरात अनेक ठिकाणी तर लोंबकळणाऱ्या तारा कोर्ट चौक, शनिपेठ परिसर, समतानगर, कांचननगर, गेंदालाल मिलसह अनेक परिसरात दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...