आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणास अटक:रात्रभराच्या रेकीनंतर पहाटे अवघ्या 15 मिनिटांत ऑपरेशन अब्दुल हादी सक्सेस; एटीएसची कारवाई

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील ‘पीएफआय’च्या पदाधिकाऱ्यांवर ‘एटीएस’ने (दहशतवादीविरोधी पथक) एकाचवेळी छापेमारी करीत १०० हून अधिक जणांना अटक केली. यात जळगावातून अब्दुल हादी अब्दुल रौफ या जालन्यात राहणाऱ्या तरुणास अटक केली आहे. अकोला एटीएसच्या पथकाने बुधवारी रात्रभर रेकी केली. अब्दुल हा अल मन्नान मशिदीत असल्याची पक्की माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर पहाटे ४.३० ते ४.४५ या १५ मिनिटांत एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पथकाच्या मदतीने एटीएसने अब्दुलला अटक करून ‘ऑपरेशन अब्दुल’ सक्सेस केले.

जळगावात बुधवारी रात्रीच अकोला एटीएसचे पोलिस उपनिरीक्षक गौरव सराक यांच्यासह सुमारे १५ जणांचे पथक तीन वाहने, दोन दुचाकींनी दाखल झाले होते. अब्दुल दत्तनगरात असल्याचे लोकेशन पथकाला मिळाले होते. त्या अनुषंगाने या पथकाने रात्रभर रेकी केली. अब्दुलचे लोकेशन कम्फर्म करून पाळत ठेवली. रात्रीच्या वेळी त्याला ताब्यात घेतल्यास परिसरात गोंधळ उडू शकतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पथकाने वेट अॅण्ड वॉच केले. पहाटे ४.१५ वाजता एसटीएसचे पथक एमआयडीसी पोलिस ठाण्यात धडकले. ठाणे अंमलदार सचिन पाटील यांना ओळख देऊन स्थानिक पोलिस बंदोबस्त मागितला; परंतु कुठे जायचे आहे? काय करायचे आहे? याबाबत गोपनीयता ठेवली. सचिन पाटील यांनी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारेंना फोन करून माहिती दिली.

त्यानुसार सपाेनि प्रमोद वाठोरे व पथक निघाले. या वेळी एटीएसचे पथक तीन चारचाकीतून पुढे जात होते. दोन दुचाकीवरून दोन अधिकारी निघाले. मागे एमआयडीसीचे पथक होते. ही सर्व वाहने दत्तनगरात उभी केली. तेथून सुमारे ५० ते ६० मीटर अंतरावर निमुळत्या गल्लीत अल मन्नान मशीद आहे. पथक मशिदीबाहेर पोहोचताच एटीएसच्या अधिकाऱ्याने ‘एक जण आला आहे, तो आत आहे का बघा’ असे आदेश देत चार कर्मचारी आत पाठवले. एक व्यक्ती साफसफाईचे काम करीत होता. त्याला विचारणा केली असता ‘एक जण आला आहे रात्री, तो वर झोपला आहे’ असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार पथक वरच्या मजल्यावर गेले. तेथे एकूण तीन जण झोपले होते.

त्यांना झोपेतून उठवल्याने ते गोंधळले ‘क्या हुआ, कोण है’ असे प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारले. या वेळी आत आलेल्या एकास पोलिस कर्मचाऱ्याने ‘बेटा पुलिस है, चल साथ मै’ म्हणत तिघांना मशिदीच्या बाहेर आणले. तिघे गोंधळलेले होते. ‘एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी तुम्हाला ताब्यात घेतले आहे. पोलिस ठाण्यात चला, तिथे सर्व माहिती देतो’ असे त्यांना सांगितले. त्यानंतर सर्वांना वाहनांमध्ये बसवून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले. चौकशी नंतर दोघांना साेडले तर अब्दुलला पथक औरंगाबाद येथे घेऊन गेले.

अब्दुलच्या पत्नीस दिली माहिती
गुरुवारी सकाळी ७ वाजता एटीएसच्या पथकाने अब्दुलची पत्नी उजमा यांना मोबाइलवर फोन करून अब्दुलला एका गुन्ह्यात ताब्यात घेतले असून, आता चौकशीसाठी औरंगाबाद येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने अब्दुलच्या पत्नीस संपर्क केला असता, अब्दुल बुधवारी सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडला. ताे ट्रान्स्पोर्ट लाइनमध्ये काम करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचेही माहीत नसल्याचे उजमा यांनी सांगितले.

ट्रस्टी म्हणतात, त्यास ओळखत नाही
अब्दुल अल मन्नान मशिदीत झोपलेला होता. या संदर्भात मशिदीचे ट्रस्टी अमीन शेख यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीस आम्ही ओळखत नाही. तो मशिदीत कधी व कसा आला याचीही माहिती नाही. सुरक्षेच्या कारणास्तव दररोज रात्री १० वाजता मशिदीचे दोन्ही गेट कुलूप बंद करतो. पहाटे ४ वाजता सफाई करणारे लोक गेट उघडतात. ही व्यक्ती कधी आली ते आम्हाला माहीत नाही, असे उत्तर शेख यांनी दिले.

हल्ल्याच्या शक्यतेमुळे पिस्तुलांसह तैनात होते पथक
अब्दुलला ताब्यात घेताना काही गैरप्रकार होऊ शकतो. पोलिसांवर हल्ला होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून एटीएसचे पथक पिस्तुलांसह तैनात होते. मशिदीमध्ये जात असताना सर्व अधिकारी, कर्मचारी सतर्क झाले होते.

बातम्या आणखी आहेत...