आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:बीए, बीकॉमचे अर्धवट शिक्षण राहिलेल्या मुक्तच्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी उपलब्ध; प्रक्रिया झाली सुरू

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी, व्यवसाय तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या तसेच दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या वंचितांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विविध शिक्षणक्रम राबवले जातात. विद्यापीठ स्थापनेपासून गेल्या ३३ वर्षांत आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेत; मात्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतरही काही कारणास्तव संबंधित शिक्षणक्रम पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी उपलब्ध करून देऊन तो शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २००० पासून विद्यापीठात वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आणि काही कारणांनी संबंधित मान्यता प्राप्त पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, अथवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण न करू शकलेल्या सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहेत. अर्धवट राहिलेला शिक्षणक्रम पूर्ण करता येईल.

मुक्त विद्यापीठात स्थापनेच्या वर्षी १९८९-९० या शैक्षणिक वर्षासाठी ३ हजार ७५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. कालांतराने मुक्त शिक्षणाला उदंड प्रतिसाद मिळत जाऊन आज ही प्रवेश संख्या पाच लाखांवर पोहोचली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू असून, आतार्यंत तीन लाखांचा टप्पा गाठला आहे. या वर्षीही मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असून, पाच लाखांपेक्षा अधिकचा टप्पा याही वर्षी गाठला जाईल. साडेतीन लाख विद्यार्थ्यांना ही चांगली संधी उपलब्ध झाली असून, तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

२२ वर्षांत अशी प्रवाहाबाहेर गेलेल्यांना संधी
२२ वर्षांत अशी प्रवाहाबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या साडेतीन लाख आहे. त्यांना लवकरच आवाहन करून, पत्र पाठवून त्यांचे अपुरे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याबाबत प्रक्रिया सुरू असून विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचे सविस्तर माहितीपत्रक उपलब्ध केले जाणार आहेत.

साडेतीन लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा
अनेकदा विद्यार्थी प्रवेश घेतात, मात्र, काही कारणांमुळे संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होईल.
डाॅ. प्रकाश देशमुख, कुलसचिव, मुक्त विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...