आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजातीय विवाहाला विरोध:हळदीच्या मंडपात वधू-वरावर प्राणघातक हल्ला; जमावाची पोलिस वाहनावरही दगडफेक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरजातीय विवाहाला विरोध करत जमावाने थेट हळदीच्या दिवशी मंडपात येऊन वधू-वरावर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांच्या वाहनावरही जमावाने दगडफेक केली.

भडगाव तालुक्यातील देव्हारी येथे सोमवारी (ता. 6) रात्री 9.45 वाजता ही घटना घडली. आरोपींविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात वर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या वधू-वराचे आज होणारे लग्न स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.

वधूला जातीची विचारणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर-वधूचे आज लग्न होते. त्यानिमित्ताने सोमवारी रात्री देव्हारी येथे हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी देव्हारी येथेच राहणारे अनिल सोनवणे, सुखदेव उर्फ अप्पा देवाराम सोनवणे, समाधान सोनवणे, दिलीप गायकवाड आणि योगेश सोनवणे यांच्यासह अनोळखी 20 ते 30 महिला, पुरूषांचा जमाव थेट हळदी मंडपात घुसला. त्यांनी वधूला जातीबाबत विचारणा केली. त्यानंतर क्षणार्धात या जमावाने हळद लागलेल्या वधू-वरावर हल्ला चढवला. सर्व हल्लेखोर हे वराचे नातेवाईक असल्याची माहिती आहे.

नवरदेव गंभीर जखमी

हळदीच्या मंडपात आरोपी अनिल सोनवणे याने चॉपरने वराच्या गळ्यावर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. जमावाने मंडप, घरातील सर्व साहित्याची तोडफोड केली. हा गोंधळ सुरू असतानाच तेथे भडगाव पोलिस पोहोचले. पोलिसांनी जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या जमावाने थेट पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करुन वाहनाच्या काचा फोडल्या. या प्रकरणी वधूने आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरुन भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...