आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांचा दबाव:पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावे; खडसेंसारखीच वागणूक मिळत असल्याची झाली भावना

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना प्रवेशासाठी आग्रह

बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थक विशेषत: वंजारी समाज संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते अजूनही नाराज असून पंकजा यांनी पक्षत्याग करावा यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवत आहेत. मात्र, या दबावाला बळी न पडता भाजपतच चित्र बदलाची वाट पाहण्याचा पुनरुच्चार पंकजा यांनी केल्यामुळे या संघटनांचे पदाधिकारी त्यांच्यावरही नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे जागृत झालेला वंजारी समाज मुंडे कुटुंबावर निस्सीम प्रेम करतो. संपूर्ण महाराष्ट्रात हा समाज विखुरलेला असून मराठवाड्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही ही संख्या लक्षणीय आहे. त्यातील बहुतांश पंकजा यांचेच समर्थक आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा यांचे नेतृत्व उदयाला येऊ नये म्हणून त्यांना एकनाथ खडसे यांच्यासारखी वागणूक देण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच काही नेत्यांकडून ठरवून त्यांना पराभूत करण्यात आले, असे या भागातील समाजबांधवांचे मत आहे.

पंकजा यांनाही खडसे यांच्यासारखेच राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी तुलना प्रकर्षाने उत्तर महाराष्ट्रात केली जाते आहे. खडसे यांनी ज्याप्रमाणे भाजपचा त्याग करून नवा मार्ग पत्करला तसाच पंकजा यांनीही पत्करावा असे या पदाधिकाऱ्यांना प्रकर्षाने वाटते आहे. त्यांनी पक्षांतराविषयी पंकजांकडे विषय काढला तेव्हा त्यांनी नकार दिल्यामुळे हे कार्यकर्ते व पदाधिकारी काहीसे नाराज झाले आहेत.

शिवसेना प्रवेशासाठी आग्रह
एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले असले तरी पंकजा यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा आग्रह हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. एक तर उद्धव ठाकरे हे पंकजा यांना बहीण मानतात. त्यांनी डाॅ. प्रीतम यांच्या विरोधात उमेदवारही दिला नाही. शिवसेना पंकजा यांना मंत्रिपद देईल, असा विश्वासही त्यांना वाटतो. काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी समाज माध्यमांवर मोहीमही सुरू केली. समाजाचा दबाव वाढला तर पंकजा पक्षत्याग करतील, अशी आशा पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...