आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी एसटीच्या मासिक पाससेवेचा लाभ घेतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व लॉकडाऊनमुळे बसेस बंद होत्या. त्यामुळे एसटीचे सुमारे दोन कोटींचे उत्पन्न बुडाले.
शासनाच्या आदेशानुसार २ फेब्रुवारी रोजी सर्व शैक्षणिक संस्था अनलॉक होऊन ऑफलाइन अभ्यासक्रम सुरू झाला. मात्र, ग्रामीण बसफेऱ्या अजूनही सुरू नसल्याने ग्रामीण पासधारक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अनलॉक व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर दसरा-दिवाळी दरम्यान एसटी पूर्ण क्षमतेने धावायला लागली. याच काळात काही दिवसांसाठी शासनाने आठवीपासूनच्या पुढील शाळा सुरू केल्या. मात्र, पुढे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा शाळा लॉक झाल्या. तिसरी लाट लवकरच क्षीण झाल्याने २ फेब्रुवारीपासून सर्व शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, एसटीच्या संपामुळे ऑफलाइन शिक्षण सुरू होऊनही एसटीच्या ग्रामीण फेऱ्यांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू आहे.
पासधारकांचे असे आहे गणित
कोरोना सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी २०२० पूर्वी फेब्रुवारी महिन्यात एसटीचे जिल्ह्यात २१ हजार २८७ पासधारक तर जळगाव आगाराचे ६ हजार ३३७ पासधारक विद्यार्थी होते. यात जिल्ह्यात मुलींच्या अहिल्याबाई योजनेत ७ हजार ११४ तर जळगाव आगारात ९७५ विद्यार्थिनींचा संपूर्णत: मोफत प्रवास सुरू होता. सर्वसाधारण पासधारक विद्यार्थ्यांकडील ३५ टक्के रक्कम एसटीला मिळाली. तर सरकारकडील ६५ टक्के येणे बाकी आहे. अहिल्याबाई योजनेतील सरकारकडून येणारी मोठी थकबाकी वसूल होणे बाकी आहे.
जळगाव जिल्ह्यात पासेसच्या खिडक्या बंद
अल्प कर्मचाऱ्यांमुळे एसटीचे केवळ फायद्याच्याच फेऱ्यांकडे लक्ष आहे. ग्रामीणच्या सर्वच फेऱ्या बंद असल्याने पासधारक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११ आगारांतील पास खिडक्या बंद आहेत. यामुळे ग्रामीण विद्यार्थी शाळा उघडूनही पासेसच्या सेवेपासून वंचित आहेत. लवकरच दहावी-बारावीसह इतरही वर्गांच्या परीक्षा सुरू होणार असल्याने पास सेवा सुरू होण्याकडे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.