आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता:दंगलीनंतर पसरली शांतता, अनेक घरांना लागले कुलूप ; बालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे

बापुराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेहरूण परिसरातील हिंदू-मुस्लिम दोन्ही समुदायांची संमिश्र वस्ती. सुमारे तीन हजार घरे, झोपडी असलेल्या या भागात अनेक चांगले-वाईट उदाहरणे आहेत. काही ठिकाणी जातीय सलोखा जोपासला जातो. तर ठरावीक भागात दंगली उफाळून येतात. या दंगलींमुळे येथील महिला, बालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. दगडफेक करणारे बेपत्ता होतात, शिल्लक राहिलेल्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होते. हातावर पोट असलेल्या या वस्तीतील कमावते पुरुष या घटनेमुळे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबीयांना कोणताच आधार राहत नाही. शिवाय पोलिसांचा ससेमिराही सहन करावा लागतो. नेहमीप्रमणे १७ मे हा पुन्हा एकदा तांबापूरवासीयांसाठी काळा दिवस ठरला. रात्रीचं जळगाव या सदरात गेल्या आठवड्यात मी व सोबतीला राजू सपकाळे हा मित्र तांबापुरात गेलो होतो. त्यावेळी तेथील पाण्याच्या समस्येसह नागरिकांचे जनजीवन समजून घेतले होते. १७ मे रोजी बिस्मिल्ला चौक, गवळीवाड्यात अगदी किरकोळ कारणावरून दंगल घडली. या दंगलीला शुक्रवारी तीन दिवस झाले होते. त्यामुळे या आठवड्यात पुन्हा एकदा याच परिसरात गेला. दंगलीनंतर तांबापुरात काय स्थिती आहे हे जाणून घ्यायचे होते. अर्थात या घटनेनंतर तणाव राहणार होताच; पण तरीदेखील दगडफेक करणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी अटक केली. इतर बेपत्ता झाले. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या निष्पाप लोकांची काय अवस्था आहे हे पाहण्यासाठी आम्ही तांबापुरात पोहोचलो. जास्त रात्री न जाता १०.३० वाजेची वेळ निवडली होती. गवळीवाड्यातून दुचाकी आत घेताच बाहेर बसलेले काही पुरुष, महिला, बालके दचकली. दंगलीनंतर दगडफेक करणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यासाठी या भागात दररोज रात्री पोलिसांची गस्त सुरू आहे. त्यामुळे गल्लीत येणारे प्रत्येक वाहन पाहून लोक दचकतात. गवळीवाड्यात काही घरांबाहेर, मंदिराच्या पायऱ्यांवर लोक बसलेले होते. थोडे पुढे गेल्यानंतर कधी न उघडणारी पोलिस चौकी गजबजलेली दिसली. दंगल घडली की, पोलिसांना जाग येते चौकीची. त्यामुळे तीन दिवसांपासून चौकीत पंखा, ट्यूबलाइट सुरू करून पाच-सहा पोलिस बंदोबस्ताला असल्याचे दिसून आले. हा पोलिस चौकीचा चौकच दंगलीचे मूळ केंद्र होते. म्हणजेच त्या दिवशी चौकीत पोलिस हजर असते तर कदाचित दंगल घडण्याआधीच नियंत्रण मिळवता आले असते. चौकीच्या समोरील काही गल्ल्यांमध्ये किर्रर्र अंधार होता. भीतीपोटी अनेक लोक घराल कुलूप लावून नातेवाइकांकडे निघून गेले होते. तो अंधार दंगलीच्या काळ्या बाजू आणखीच गडद करीत होता. एक महिला लहान मुलासह डोक्याला हात लावून रस्त्यावर बसली होती. कदाचित तिच्या कुटूंबातील पुरुष मंडळी पोलिसांच्या धाकामुळे निघून गेलेली असावीत किंवा ते दगडफेकीत सहभागी असल्यामुळे पळून गेल्याचीही शक्यता आहे. आता त्यांच्या चुकांमुळे महिला, लहान मुलाची काळजी घेणारे घरी कोणीच नव्हते. यातच जातीय दंगल झाल्यामुळे आता मदत करणारे हातदेखील एकमेकांचे जात, धर्म पाहूनच मदत करतील हे निश्चित आहे. हताश बसलेल्या या महिलेकडे पाहून दंगलीचे चटक्यात माणुसकीच जळून खाक झाल्याचा भास होत होता. दुसरीकडे पाणीटंचाई असल्यामुळे काही महिला पाणी साठवण्यासाठी ड्रम डोक्यावर घेऊन घराकडे निघाल्या होत्या. हे पुरुषांनी करायचे कामे महिलांवर येऊन ठेपण्याचे कारणही दंगलच आहे. सन २०१४ मध्ये बरोबर याच भागात संक्रांतीच्या दिवशी दोन्ही समुदायांमध्ये दंगल झाली होती. त्यावेळी दंगलीचे वृत्तांकन करण्यासाठी माझ्यासह इतर माध्यमाचे प्रतिनिधी तेथे पोहोचले. दोन्ही बाजूने दगडफेक सुरू असताना आम्ही एका पत्र्याच्या शेडखाली उभे राहून अासरा घेतला होता. वरून मोठमोठे दगड येत होते. या दंगलीनंतर तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी बैठक घेऊन सात दिवसांची संचारबंदी लागू केली. या सात दिवसांत दंगेखोरांसह सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. पोलिसांनी दररोज प्रत्येक घर, झोपडी तपासून दंगेखोरांना अटक केली. हे सर्व चित्र मी पाहिले, अनुभवले होते. ते प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यासमोर जशेच्या तशे उभे राहिले. तांबापुरात जातीय सलोख्याचीही अनेक चांगली उदाहरणे आहेत. या सकारात्मक-नकारात्मक घटनांमुळे ही वस्ती अनेक वर्षांपासून वाढते, शिकते व समजते आहे. कधीही, कुठेही दंगली घडायला नको हेच विचार डोक्यात येत असताना आम्ही दुचाकी घराकडे वळवली.

बातम्या आणखी आहेत...