आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नववधूंना भावतेय साेन्याचे पेशवाई मंगळसूत्र

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मुलीच्या जीवनातील सर्वाेच्च क्षण असताे ताे विवाहाचा. त्यासाठी अर्थात मंगळसूत्राची निवड ही खूपच चाैकसपणे केली जाते. जळगावातील सराफा बाजारात वेगवेगळ्या नवनवीन डिझाइन व पॅटर्न उपलब्ध आहेत. मात्र, असे असले तरी सध्या नववधूंकडून पेशवाई मंगळसूत्रांना सर्वाधिक मागणी आहे. दुकानात जर दहा ग्राहक आले तर त्यापैकी सहा जणींकडून पेशवाई मंगळसूत्राला पसंती दिली जाते आहे, असे व्यावसायिक सांगतात.

साेन्याच्या विविध प्रकारच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुवर्णनगरी जळगाव शहरात मंगळसूत्रांच्या शेकडाे डिझाइन उपलब्ध आहेत. त्यात अगदी चार ग्रॅम साेन्यातील मणी आणि वाट्यांपासून सुरुवात हाेऊन तब्बल दीडशे ग्रॅम वजनातील मंगळसूत्र उपलब्ध आहेत. वधूपिता आपल्या क्षमतेनुसार व वधूच्या पसंतीने मंगळसूत्र या दागिन्यांची खरेदी करीत असतात.

सराफा दुकानांत पारंपरिक साखळी, अॅन्टिक, मीनाकाम असलेले, पेशवाई तसेच राजकाेट पॅटर्न या पाच प्रमुख डिझाइनची सध्या जास्त मागणी वाढली असली तरी त्यातही पेशवाई पॅटर्नला सर्वाधिक मागणी नववधूंकडून आहे.

पेशवाई मंगळसूत्र ३० ग्रॅमच्या पुढे
पेशवाई मंगळसूत्र हे भरीव दागिन्यांच्या प्रकारात माेडते. त्यामुळे ते ३० ग्रॅम वजनापेक्षा अधिक साेन्यातच घडवले जातात. अगदी दीडशे ते दाेनशे ग्रॅम वजनातही सुवर्णनगरीत ते उपलब्ध आहेत. वजनामुळे त्याची किंमत दीड लाखाच्या पुढे सुरू हाेऊन थेट आठ लाखांपर्यंत आहे. काेराेनाच्या दाेन वर्षांच्या कालखंडानंतर लग्न धूमधडाक्यात हाेत असल्याने या दागिन्यांची मागणी वाढली आहे.

ठसठशीतपणा अधिक भावताे
पेशवाई प्रकारातील मंगळसूत्र हे दणकट व ठसठशीत असतात. ते तसे नियमित वापरले जात नाहीत. मात्र, वेगवेगळ्या काैटुंबिक साेहळ्यात प्रतिष्ठा म्हणून महिला वर्गाची हाैस यातून पूर्ण हाेते. त्याचबराेबर दैनंदिन वापरासाठी या प्रकारांत वजनाने हलके आकर्षक कलाकुसरीचे मंगळसूत्रही उपलब्ध आहेत. गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातूनही दागिने खरेदीसाठी ग्राहक माेठ्या संख्येने जळगावात येतात.

मालिका, सिनेजगतामुळे आता बदलू लागला दागिन्यांचा ट्रेंड
सद्य:स्थितीत मनाेरंजन वाहिन्यांवरील मराठी आणि हिंदी मालिकांमधील नायिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने खास करून घडवून घेतले जातात. त्याचा प्रभाव सर्वसामान्यांवर िवशेषत: युवावर्गावर अधिक असताे. मंगळसूत्र घेण्यासाठी येणाऱ्या विविध भागातील विवाहेच्छुक तरुणींकडून सध्या पेशवाई प्रकारातील मंगळसूत्राला सर्वाधिक पसंती दिली जाते आहे, असे जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकांकडून सांगण्यात येते आहे.

बातम्या आणखी आहेत...