आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबराव पाटलांविरोधात ठाकरे गटाचा पोलिस ठाण्यात ठिय्या:गुन्हा दाखल करा अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्याचा पावित्रा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना ‘नटी’ म्हटल्याचा आराेप करत ठाकरे गटाने रविवारी जाेरदार आंदाेलन केले. गुलाबरावांविराेधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा यासाठी दुपारी माेर्चा काढत शहर पाेलिस ठाण्यात ठिय्या आंदाेलन करण्यात आले. शिवसैनिकांची तक्रार स्विकारून कायदेशीर मार्गदर्शन घेणार असल्याचे पाेलिसांनी सांगीतले. त्यामुळे ठाकरे गटाने आता पालकमंत्र्यांविराेधात न्यायालयीन लढाई लढण्याची घाेषणा केली.

नटी, अन् सिनेमा

महाप्रबाेधन यात्रेच्या निमीत्ताने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे तीन दिवस जळगाव दाैऱ्यावर येवून गेल्या. अंधारे यांनी केलेल्या आराेपांसंदर्भात माध्यमांशी बाेलताना पालकमंत्री पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाला ‘सिनेमा’ म्हटल्याने सुषमा अंधारे यांना ‘नटी’ म्हटल्याने महिलांचा अवमान झाल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

विनयभंगाचा गुन्हा दाखल करा

महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्र्यांविराेधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. यासाठी रविवारी दुपारी 12 वाजता ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, महापाैर जयश्री महाजन यांच्या नेतृत्वात सुमारे 100 ते 150 शिवसैनिकांनी शहर पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढला हाेता.

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या पोलिस ठाण्यात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करताना.
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या पोलिस ठाण्यात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करताना.

तासभर ठिय्या आंदाेलनाने तणाव

गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे आंदाेलन झाले. त्यानंतर संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात दाेन दिवसांपुर्वी शहर पाेलिस ठाण्यात आंदाेलन करण्यात आले. त्यापाठाेपाठ रविवारी पुन्हा ठाकरे गटाकडून ठिय्या आंदाेलन झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. रविवार असल्याने मार्केट बंद असल्यामुळे पुर्वीच्या तुलनेत वाहतुकीची काेंडी टळली.

गुन्हा दाखल न करता तक्रार स्विकारली

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महापाैर महाजन, अ‌ॅड. ललिता पाटील, गजानन मालपुरे यांच्यासह शिष्टमंडळाने शहर पाेलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दिलीप भागवत यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे महिला वर्गाचा अवमान झाला असून त्यांनी यापुर्वी देखिल असे विधाने केली आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली. परंतु पाेलिसांनी तक्रारीसंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेवून पुढचा निर्णय कळवू असे सांगीतले. त्यामुळे तासाभरानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.

पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक

जळगाव व रावेर लाेकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक आयाेजित करण्यात आली आहे. यासाठी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महापाैर जयश्री महाजन, उपमहापाैर कुलभूषण पाटील, विराेधीपक्षनेता सुनील महाजन यांच्यासह 30 ते 35 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लाेकसभा मतदार संघ निहाय चर्चा केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...