आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आषाढस्य प्रथम दिवसे...:शेतकरी-कष्टकऱ्यांचे भावविश्व फुलवणारा आनंददायी आषाढ

जळगाव ( प्राचार्य डॉ. किसन पाटील )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मातीच्या नवसर्जनाचा मिलन सोहळा

आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस...या दिवशी आपल्याला आवर्जून आठवण येते ती कालिदासांची. या महाकवीने लिहिलेल्या ‘मेघदूता’मधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे...’ या श्लोकापासून, जलभरल्या मेघाला आकाशातून जाताना जमिनीवरून सुरू असलेली शेतीची कामे, पेरण्यांची लगबग आणि एकूणच जलधारांच्या स्वागताला सज्ज झालेली धरा कशी दिसते याचे वर्णन कालिदासांनी केले आहे. हजारो वर्षांपूर्वी कालिदासांनी लिहिलेल्या या ग्रंथातून उभे केलेले आषाढातील वातावरण आणि या काळात सुरू असणारी शेतीची कामे यामध्ये आजही साम्य आढळते. त्यामुळे शेती, शेतकरी आणि कालिदासांचा मेघदूत यांचे एक अनोखे नातेच निर्माण झाले आहे.

आषाढ महिन्याचा पहिला दिवस महाकवी कालिदासांनी साहित्यात अमर करून ठेवला आहे. तसा हा भारतीय वर्षातील चौथा महिना असतो. चैत्र, वैशाख व ज्येष्ठ या तीन महिन्यांत कडक उन्हाळा असतो. शेती तापली की नवसर्जनासाठी तयार होते. कृषीवल शेती-मातीची मशागत करतात. नांगरणी, वखरणी, सपाटणी करून तिला तयार करतात. राबराब राबुनिया कष्टकरी घाम गाळतात. त्या घामाचे सोनं पिकते असा आशावाद असतो. उन्हाचा तडाखा, उकाडा व अंगाची लाही लाही होऊन त्राही- त्राही होणारे सारेच जीव वाट पाहत असतात पावसाची. कोकिळेचा ‘कुहूकुहू’ आणि पावशा पक्ष्याचा ‘पेरते व्हा पेरते व्हा’ असा संदेश येतो. ज्येष्ठात अवकाळी पाऊस येतो. रोहिणी नक्षत्रात अंडी गळतात पाण्याची. जरा शांती वाटते. मग येतो आषाढ महिना. वर्षाऋतूच्या आगमनाने आषाढ धाऊन येतो. पृथ्वीचे तप्त शरीर, माती नवसर्जनाला आसुसलेली असते. ढगांच्या प्रेमाची आेढ व पावसाच्या सहस्रधारांमध्ये चिंब होऊन जमिनीला मिलनाची आसक्ती दाटून आलेली असते. बाष्प भरलेली हवा, कधी कुंद तर कधी वादळी वर्षाऋतूच्या सहवासात धुडगूस घालणारी नवयौवना. वर्षाऋतूचे आगमन होते. जलस्रोत वाहतात. नदी-नाले तुडुंब भरतात. मातीची तृप्तता होते. बी-बियाणे सजतात. पेरणी करतात, कृषी संस्कृतीचे नवसर्जन पर्व सुरू होते. बीज अंकुरतात, पीक ताल धरतात, जन्माचा सोहळा डाेलून साजरा करतात, मातीच्या नवसर्जनाचा मिलन सोहळा व नवनिर्मिती चेतना शक्तीला घेऊन आषाढ सज्ज असतो.

देवांना झोपवणारा व कृषीवलांना कर्मयोगात जागवणारा हा आषाढ आनंददायी ठरतो. दिलासा, अभिलाषा व सुखाची भाषा घेऊन आषाढ येतो. पेरण्या घडवतो, डोंगर पर्वतांना हिरवेगार बनवतो. निसर्गसृष्टी फुलवतो. कालिदासांनी आपल्या ‘मेघदूत’ या काव्यातून ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या आेळीने सुरुवात केली. आषाढचा सन्मान वाढला. प्रेमकाव्यरूपी नाट्य, विरह मनातले भावकाव्य, प्रेमाचे अभिव्यंजनापूर्ण वर्णन व भाषा साहित्य हे संवाद माध्यम असल्याचे सर्जन कालिदासांनी घडवले. मेघ हा दूत बनवून विरही प्रेमनायकाच्या भावना प्रियतमेकडे पोहोचवण्याचा माध्यम बनवला. भावप्रधान, शृंगाररसपूर्ण, अालंकारिक भाषेतील सुमधुर कथाकाव्य व नाट्यमय सृष्टीचा अाविष्कार म्हणजे मेघदूत म्हटला पाहिजे. ढगांच्या दृष्टीतून विहंगावलोकन करीत हा मेघ पिके, शेती, नगरे, नदी-नाले, डांेगर-पर्वत, निसर्ग-माणसे अशी अवघी सृष्टी कशी दृष्टीस पडते याचे सर्वांगसुंदर वर्णन आषाढ मासातल्या सृष्टीतून अभिव्यक्त करतो. अशा या शेतकरी-कष्टकरी जनतेचे भावविश्व फुलवणाऱ्या आषाढ महिन्याचे स्वागत करण्यासाठी सारी सृष्टी सज्ज झाली आहे.

मातीच्या नवसर्जनाचा मिलन सोहळा
आषाढ म्हणजे शेतकरी कष्टकरी वर्गाला आशेचा किरण दाखवतो, ढगांच्या पुंजक्यातून मेघगर्जना करीत काळा कापूस पिंजतो, मुसळधार-धुव्वाधार पावसात रुंजी घालतो. गायी, म्हशी, प्राणी, पक्षी यांना शीतल-शांत पांघरूण घालतो. जमिनीच्या नवयौवनाच्या सर्जनाच्या वेणा साकारतो. पेरणी, मशागत, वखरणी, कोळपणी, मेहनतीला बळ देतो. पांडुरंगाच्या पंढरीच्या वाटेत ज्ञानभक्तीच्या सागरात संपृक्त करतो. जीवसृष्टीच्या अंकुरलेल्या कोंबातून नवसर्जन प्रेमभाव जपतो.

बातम्या आणखी आहेत...