आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसक्या आवळल्या:नक्षली वेशभूषा करून पोलिसांनी ओडिशातून पकडले भामट्याला, केवायसीच्या नावाने महिलेची केली होती फसवणूक

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवायसी करून देण्याच्या नावाने महिलेला फोन करून त्यांच्या बँक खात्यातून १० हजार रुपये परस्पर वर्ग करून घेतल्याचा प्रकार शहरात घडला होता. या गुन्ह्यातील भामट्यास जिल्हापेठ पोलिसांनी ओडिशा राज्यातील नक्षलग्रस्त भागातून अटक केली. पोलिसांनी नक्षली वेषभूषा करून या भामट्याला पकडले.

काँग्रेस नारायण कुढेही (वय २६, रा. पंडापदर, ता. रामपूर, जि. कालाहंडी, ओडिशा) असे पकडलेल्या भामट्याचे नाव आहे.

गजानन कॉलनीतील अनुपमा प्रभात चौधरी यांना केवायसी करण्याबाबत अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. या भामट्याने केवायसीच्या नावाने चौधरी यांना एक लिंक पाठवली. लिंक ओपन केल्यानंतर त्यांना एक ओटीपी नंबर मिळाला. बोलण्यात गुंतवून भामट्याने त्यांच्याकडून ओटीपी मागवून घेतला. त्यानंतर काही वेळातच चौधरी यांच्या बँक खात्यातून १० हजार परस्पर वर्ग झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तांत्रिक बाबींचा तपास केल्यानंतर संबंधित भामटा हा ओडिशा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महेंद्र पाटील, सलीम तडवी, विकास पहूरकर यांचे पथक ओडिशा राज्यात रवाना केले. हा भामटा नक्षलग्रस्त भागात राहत असल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हापेठ पोलिसांनी स्वत: नक्षली वेषभूषा करून रेकी केली. यानंतर संधी मिळताच काँग्रेस कुढेहीच्या मुसक्या आवळून त्याला जळगावात आणले.

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता
भामट्याला १८ मार्च रोजी कोर्टात हजर केल्यानंतर २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या भामट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...