आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याची लाेकसंख्या ४५ लाखांच्या घरात असताना वाहनांची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. वाहनांच्या आयुष्यमानाचा विचार केला तर १५ वर्षांनंतर ते पर्यावरणाला अधिक हानी पाेहाेचवते. एक ते दाेन वर्षे ग्रीन टॅक्स भरून याेग्यता प्रमाणपत्र घेऊन अशी वाहने कार्यरत करता येऊ शकतात; परंतु १५ ते १७ वर्षांपेक्षाही जुनी ३५ हजारांहून अधिक वाहने जिल्ह्याच्या प्रदूषणात भर पाडत आहेत. राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक प्रदूषण जळगावात असून त्यात ही जुनी वाहनेही कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्यात वाहनांच्या नाेंदणी, परवाना आदींबाबत नियंत्रणासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग आहे.
त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार एप्रिल ते मार्च २०२१ दरम्यान जिल्ह्यात वाहनांची संख्या ११ लाख १९ हजार २५९ एवढी हाेती. एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत त्यात १ लाख ४१ हजार १११ वाहने नव्याने नाेंदवली गेली आहेत. वाहनांचे सामान्य आयुष्य १५ वर्षे असले तरी त्यात पर्यावरण कर भरून दरवर्षी याेग्यता प्रमाणपत्र घेऊन वाहनाची पुनर्नाेंदणी करता येते.
त्यासाठी वाहन हे तांत्रिकदृष्ट्या वापरण्यायाेग्य असणे अपेक्षित आहे. गेल्या दाेन वर्षांत १६ वर्षांपेक्षा अधिक आयुष्यमान असलेल्या पाचशेहून अधिक रिक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्क्रॅपमध्ये (भंगारात) काढून थेट जेसीबीने ताेडल्या हाेत्या. त्यानंतर शहरात वाहतुकीदरम्यान निघणारे धुराचे लाेळ कमी झाले. रिक्षांसह इतर दुचाकी, चारचाकी वाहनांचा एकत्रित आकडा मात्र नगण्य आहे. १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०२२ या सात वर्षांच्या कालावधीत अवघी १०१९ वाहने ही भंगारात गेली. त्यामुळे मुदतवाह्य वाहनांवरील कारवाईचा मुद्दाही आता पुढे येऊ पाहत असल्याचे दिसते आहे.
एअर प्युरिफायर लावणार, चार चार्जिंग स्टेशन उभारणार
जळगाव शहर महापालिकेने तातडीने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहरात चार ठिकाणी वायुप्रदूषण राेखणारे चार्जिंग स्टेशन बनवण्याची तयारी सुरू आहे. शासनाकडून ८६ लाखांचा निधीही आहे.
कालबाह्य झालेल्या सर्वाधिक दुचाकी; पर्यावरणाला बाधा
जिल्ह्यात भंगार झालेल्या वाहनांतून प्रदूषण हाेऊन पर्यावरणाला हानी पाेहाेचते. याबाबत आरटीआेकडे स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नाही; परंतु अशा वाहनांची संख्या किमान ३० ते ३५ हजारांच्या पुढे असल्याचा अंदाज सूत्र व्यक्त करतात. त्यातही दुचाकींचा आकडा निम्म्यांहून अधिक आहे. त्यानंतर नंबर येताे ताे विटा, रेती, इतर गाैण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा. आरटीआेकडे या वाहनांचा एवढा माेठा आकडा असताना वाहन तपासणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे केले जाते.
हवेची गुणवत्ता १५०च्या पुढे
महाराष्ट्रात मुंबईनंतर जळगाव हे प्रदूषणात राज्यात दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. जळगावातील हवेची सरासरी गुणवत्ता (एक्यूआय) १५० ते १६४च्या दरम्यान आहे. शहरात पीपीएम १० या धूलिकणांचे प्रमाण १६४च्या पातळीवर तर पीपीएम २.५ धूलिकणांचे प्रमाण १५७वर आहे. त्यात वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे हवा अधिक प्रदूषित हाेत आहे. मुंबईतील हवेचा एक्यूआय १७७च्या पातळीवर आहे. त्यामुळे प्रदूषणाचा विषय एेरणीवर आला असून ताे अधिक चिंतेचा बनू पाहताे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.