आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पोस्ट कोविड : रुग्णांत मानसिक आजार 10% वाढले

धनश्री बागूल | जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनावश्यक उपचार पद्धती आणि स्टेरॉइडच्या अतिवापराने पोस्ट कोविडची रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे दीर्घकाळ आजारी राहिलेल्या रुग्णांमध्ये पोस्ट कोविड सिंड्रोमचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे हृदयविकार, श्वसनविकार व मानसिक आरोग्याची समस्या ८ ते १० टक्क्यांनी वाढल्याचे प्रकार समोर आले आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या कोरोना आढावा बैठकीतही या रुग्णांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासह इतर बाबींवर चर्चा झाली. शिवाय तज्ज्ञांनीही या रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष वेधले आहे.

कोरोना बाधितांचे दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारात बरे होणारे तर दुसऱ्या प्रकारात दीर्घकालीन आजारी असलेल्या रुग्णांचा समावेश होतो. यात १२ आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांमध्ये पोस्ट कोविड सिंड्रोमचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशात २० टक्क्याहून अधिक बाधितांना पुन्हा कोरोना झाल्याची नोंददेखील जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. कोरोना झालेल्या व्यक्तींना देण्यात आलेल्या स्टेरॉइड इंजेक्शनमुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत आहेत. यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा वातावरण, ताणतणाव अथवा इतर कारणे हृदयविकाराची वाटत असली तरी वैद्यकीय तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार पोस्ट कोविड आजार हेच प्रमुख कारण पुढे आले आहे.

राज्य संचालक आणि सहसंचालकांच्या उपस्थितीत राज्य टास्क फोर्सच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नुकत्याच झालेल्या बैठकीत कोरोनाचा आढावा घेण्यात आला. यात पोस्ट कोविडच्या रुग्णांच्या आरोग्याबाबतही लक्ष वेधण्यात आले. त्यानुसार या रुग्णांनी नियमित आरोग्य तपासणी, व्यायाम, आहार याकडे लक्ष देण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनामुळे फुप्फुस निकामी होण्यास सुरुवात झाल्याने श्वसनाच्या विकारातही वाढ झाली आहे. दीर्घकालीन कोरोना बाधितांना व को-मॉर्बिड रुग्णांना त्रास सुरू झाला आहे. भविष्यात हा त्रास वाढणार असल्याने रुग्णांनी शुगर, बीपी नियंत्रणात ठेवावे व आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. असे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले. कोरोनानंतर रुग्णांनी चांगला आणि सकस आहार घ्यावा, जेणकरून आरोग्य हे चांगले राहील, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

शुगर, बीपी नियत्रंणात ठेवा; नियमित तपासणी करा
पोस्ट कोविडच्या रुग्णांमध्ये हृदयविकारासह अन्य व्याधी वाढल्या आहेत. त्यामुळे ३० वयोगटावरील या लोकांनी नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. आधी चाळीशीनंतर नियमित तपासणीचा सल्ला देत होतो. रक्तदाब, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासह तरुणांसह वृद्धांना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
डॉ. लीना पाटील, सदस्य, कोरोना कृती दल

बातम्या आणखी आहेत...