आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशाबाबानगर, आर. एम. एस. कॉलनी, माऊलीनगर या परिसरातून जाणाऱ्या मुख्य रस्ता संपूर्णत: कच्चा आहे. हा संपूर्ण परिसर खोल भागात वसलेला असल्याने पावसाळ्यात अनेक भागात पाणी साचते. तर अनेक भागातील जनजीवनही विस्कळीत होते. त्यामुळे कमीतकमी आशाबाबानगर, आरएमएस कॉलनी, माऊलीगनर परिसरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करा, असे साकडे अडीचशेच्यावर नागरिकांनी आयुक्त आणि महापौरांना घातले आहे.
शहरातील आशाबाबा, आरएमएस कॉलनी, माऊलीनगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यांअभावी त्रस्त आहेत. आशाबाबानगर खोलगट भागात वसलेले असल्याने पावसाळ्यात येथे अनेक तळेसाचून येथील नागरिकांचा शहरातील संपर्कही तुटतो. त्यामुळे या भागात रस्ते करण्याची गरज आहे. यासाठी या परिसरातील अडीचशेवर नागरिकांनी लोकशाही दिनाचे औचित्य साधून आपल्या भागातील रस्त्यांच्या व इतर असुविधांबद्दल महापौर व आयुक्तांना निवेदन दिले. या वेळी बाजीराव ससाणे, विलास पाटील, शैलेश शिरसाठ, सुभाष पाटील, कोमलसिंग पाटील, कांतीलाल पाटील आदी उपस्थित होते.
मुख्य रस्त्याचे काम करा
माऊलीनगर ते आशाबाबानगर या मुख रस्त्याचे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. या परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. पावसाळ्यात या रस्त्याची अधिक दयनीय स्थिती होते. या रस्त्यावरून सतत रहदारी सुरू असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा रस्ता होणे गरजेचे बनले आहे, असे हेमंत खैरनार यांनी म्हटले.
महिला व ज्येष्ठांना त्रास
पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांना आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी मुख्य रस्त्यावर यावे लागते. मात्र, आशाबाबानगर, आरएमएस कॉलनी, माऊलीनगर हा मुख्य रस्ता देखील विविध समस्यांनी भरला आहे. हा रस्ता संपूर्ण रस्ता कच्चा असल्याने कमीत कमी येथील मुख्य रस्त्याचे तरी काम होणे गरजेचे आहे. या परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांसह महिला व ज्येष्ठांना अधिक त्रास सहन करावा लागतो, असे अभिषेक पालीवाल यांनी म्हटले.
आश्वासने ठरतात फोल
आशाबाबानगर ते आरएमएस कॉलनी हा प्रमुख रस्ता तयार करण्यासाठी वेळोवेळी मागणी केली. रस्ता तयार करण्याससंदर्भात आश्वासने मिळूनही हा रस्ता कच्चाच राहिला आहे. या कच्चा रस्त्यामुळे परिसरातील विद्यार्थी, वृद्ध नागरिकासह वाहनधारकांचे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हाल हातात. अनेकदा दुचाकी अडकण्याचे प्रकारही घडले आहेत. येथील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, असे ललित महाजन यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.