आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Pour The Water Of The Mill Into The Bhokarbari At Full Capacity; The Guardians Of The Villagers Of Bara Village Submitted To The District Collector Along With The Minister| Marathi News

दिव्य मराठी विशेष:गिरणाचे पाणी भोकरबारीत पूर्ण क्षमतेने साेडा; बारा गावातील ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरणा नदीतून विसर्ग होणारे पाणी पूर्ण क्षमतेने साेडल्यास भोकरबारी धरण भरून १२ गावाची शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर हाेईल. याबाबत याेग्य उपाय याेजना करण्यात याव्या अशी मागणी गुरुवारी शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

भोकरबारी धरण अंदाजे ५० टक्के भरले आहे. अतिवृष्टी होवून ही नियोजनाच्या अभावामुळे धरण समाधानकारक भरू शकले नाही. त्याचा परिणाम आगामी उन्हाळ्यात १२ गावांचे नागरिक व धरणाच्या सिंचन क्षेत्रातील भोकरबारी, कंकराज, भिलाली, रत्नापिंप्री गावातील शेतकऱ्यांना भोगावे लागतील. त्यामुळे या १२ गावांना प्रतिवर्षाप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागतील व शासनाच्या तिजोरीवर भार पडेल.

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्यात व त्यांनी त्याच शिवारात अन्यत्र विकत घेतलेल्या जमिनींना पाणीपुरवठा होणार नसेल तर तो एक प्रकारे कष्टकरी शेतकऱ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल. त्यामुळे गिरणा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू असून हे पाणी पाटचारीतून म्हसवा तलावात आणून १५ दिवस पूर्ण क्षमतेने भोकरबारी धरणात सोडले तरी पाण्याचा प्रश्न सुटेल.

तसेच खरिपात झालेल्या ५० टक्के नुकसानीची भरपाई रब्बीच्या माध्यमातून होवू शकते. या प्रकरणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी स्वत: लक्ष घालून १२ गावातील नागरीक व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर बोदर्डे येथील उपसरपंच बाळासाहेब हिलाल पाटील, भोकरबारीचे सरपंच राहुल तुकाराम पाटील, बोदर्डे येथील सरपंच जितेंद्र पाटील, पोलिस पाटील समाधान देविदास पाटील, १२ गावांच्या पाणीपुरवठा योजना असलेल्या सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चारी ५०० मीटर अंतरापर्यंत खोल झाल्यास सहज भरेल धरण
दोन महिन्यांपासून गिरणा नदी दुथडी वाहत आहे. हे पाणी तापी नदी पात्रात वाया जात आहे. सुरूवातीला काही दिवस पाटचारीतून म्हसवा तलाव १०० टक्के भरण्यात आला. त्यानंतर ४ ते ५ दिवस भोकरबारी धरणात पाणी साेडले हाेते; परंतु म्हसवा धरणातून भोकरबारी धरणात पाणी वाहून आणणारी चारी म्हसवा धरणाच्या तोंडाशी उथळ असल्याने म्हसवा तलावातून सांडव्याने तलावातून नाल्यामध्ये जास्त, भोकरबारी धरणासाठीच्या चारीतून कमी पाणी विसर्जित होते. त्यामुळे धरण भरण्यास विलंब लागतो. ही चारी फक्त ५०० मीटर अंतरापर्यंत खोल झाल्यास भोकरबारी धरण १५ दिवसांत तुडूंब भरू शकते.

बातम्या आणखी आहेत...