आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3300 मेगावॅटची तूट:महाराष्ट्रातही वीजसंकट! महानिर्मितीचे 6 संच बंद, राज्य लोडशेडिंगच्या उंबरठ्यावर

भुसावळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याच्या दररोज मागणीच्या तुलनेत 30 हजार मेट्रिक टन कोळशाची तूट

राज्यात कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मिती निम्म्याने घटून विजेचे भीषण संकट निर्माण झाले आहे. वेस्टर्न कोलमिलमधून सध्या रोज २७ ते ३० हजार मेट्रिक टन कोळसा कमी मिळत असल्याने चंद्रपूर, भुसावळ, नाशिक, पारस, खापरखेडा या ५ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील ६ वीजनिर्मिती संच बंद झाले आहेत. यामुळे महानिर्मितीच्या १०,५०० मेगावॅट स्थापित क्षमतेच्या तुलनेत केवळ ५,३०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. महानिर्मितीला दररोज १ लाख ३० हजार मेट्रिक टन कोळशाची गरज भासते. रविवारी मात्र केवळ १ लाख ३ हजार मेट्रिक टन कोळसा मिळाला. हीच स्थिती कायम राहिली तर राज्यावर भारनियमनाची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. महानिर्मितीचे संचालक (कोळसा) पुरुषोत्तम जाधव म्हणाले, आता स्थिती सुधारत आहे. येत्या आठवडा ते पंधरवड्यात दररोज मागणीनुसार १ लाख ३० हजार मेट्रिक कोळसा मिळेल. सध्या केंद्रांकडे अर्धा ते एक दिवसाचा साठा आहे. आठवडाभर पाऊस थांबल्यास ही स्थिती पूर्ववत होईल.

विदेशी कोळसा महाग होताच देशी कोळशाची मागणी १८% वाढली
अशोककुमार, संजय मिश्रा | धनबाद
देशातील १३८ पैकी ७२ वीज प्रकल्पांकडे ३ दिवसांपुरताच कोळसा... ५० प्रकल्पांकडे ४ ते १० दिवसांपुरताच! ही स्थिती का उद्भवली? कोळशासाठी ज्या कोल इंडियावर देश अवलंबून आहे तो पुरेसा पुरवठ्यात अपयशी ठरला? दै. भास्करच्या पडताळणीत समोर आले की, सध्या कोल इंडियाजवळ ४०० लाख टन कोळशाचा साठा उपलब्ध आहे.

यामुळे कोल इंडिया २४ दिवसांपर्यंत कोळशाचा पुरवठा करू शकते. विदेशात कोळसा महाग होताच वीज प्रकल्पांनी त्यांची आयात बंद केली. ते पूर्णपणे कोल इंडियावर विसंबून आहेत. पडताळणीत असेही समोर आले की, कोळसा टंचाईवर मात करण्याची प्रकल्पांचीही तयारी नाही. प्रकल्पांनीही साठवणूक क्षमता घटवली आहे. जसा पुरवठा घटला तसे वीज िनर्मिती युनिट बंद होऊ लागलेत. म्हणजेच आयात बंद झाल्याने निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्याची ना कोल इंडियाची तयारी आहे ना वीज प्रकल्पांची.

इकडे, दिल्लीत कोळसा मंत्रालयाने रविवारी सांगितले की, प्रकल्पांकडे पुरवठ्यासाठी कोळशाचा पुरेसा साठा आहे. प्रकल्पांकडे सध्या ७२ लाख टन कोळसा आहे. तो ४ दिवस पुरेल. कोल इंडियाकडेही ४०० लाख टनाहून अधिक कोळसा आहे. त्याचा वीज प्रकल्पांना पुरवठा केला जाणार आहे. तर वीज मंत्रालयाने रविवारी सांगितले की, विजेचा वापर शनिवारी ७.२ कोटी युनिटहून (२%) घटून ३८२.८ वर राहिला आहे. शुक्रवारी तो ३९० कोटी युनिट होता. यामुळे कोळसा टंचाईमुळे देशभरातील वीज पुरवठ्यात सुधारणा झाली आहे.

एसईसीएलचा दावा- पुरेसा कोळसा
छत्तीसगडच्या बिलासपूर येथील साउथ ईस्टर्न कोलफील्ड लि. (एसईसीएल) च्या आकडेवारीवरून दिसते की कंपनीने मागील वर्षाइतकेच कोळशाचे उत्पादन केले आहे. मात्र, एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्के अधिक कोळशाचा पुरवठा केल्याचा दावा केला केला आहे.

पुढे काय?... उत्पादन वाढावे, जो कोळसा तो पाठवावा
- मान्सून व इतर कारणांनी कोळशाचे उत्पन्न बाधित झाले आहे. ते आपल्या हातीही नाही. परंतु पाठवणे आपल्या हातात आहे. जो काही साठा आहे तो अधिकाधिक प्रकल्पांपर्यंत पोहोचता करावा.
- मान्सून परतला, आता उत्पादन वाढवावे : टॉप टू बॉटम अशा दिशेने काम करावे. जसे सरकार सांगत आहे त्याप्रमाणे योजना आखून उत्पादनासाठी लागावे.
- धोरणात्मक निर्णय अडकाठी ठरू नये : अनेक प्रकल्पांतील काम बंद आहे. मेगा माइन्सकडे उत्पादनासाठी पाच वर्षांसाठीची जमीन उपलब्ध असावी. अनेक खाणी जमिनीच्या वादातून बंद पडल्या आहेत. त्या चालू व्हाव्यात.

मात्र... कोल इंडिया उत्पादन उद्दिष्टापासून २६७.५ लाख टन मागे
आकडे सांगताहेत की, दोन वर्षांत कोल इंडियाचे कोळसा उत्पादन १०६.७ लाख टन घटले आहे. सप्टेंबर २०२१-२२ पर्यंत कंपनीने २६००.७ लाख टन उत्पादन केले. मात्र, उद्दिष्ट२८७४.२ लाख टन होते. म्हणजे सध्या कोल इंडिया आपल्या उद्दिष्टापेक्षा २६७.५ लाख टनाने मागे आहे.

मागणी-निर्मितीत तूट, वापर कमी करण्याचे आवाहन
- रविवारी सायंकाळी ६.१० वाजता राज्याची वीज मागणी १८,५९८, तर महावितरणची मागणी १६,३२० मेगावॅट होती. राज्याची वीजनिर्मिती केवळ १२,४५९ मेगावॅट इतकी होती.

या ४ कारणांमुळे वीज संकट गहिरे झाले...
1
. उद्योग सुरू झाल्याने मागणी वाढली : कोरोनात बंद उद्योग अनलॉक होताच विजेची मागणी वाढली. वीज प्रकल्पांत आज १८% वर कोळशाची मागणी आहे. कोल इंडिया ५-१०% वाढीव मागणी पूर्ण करू शकतो.
2. जास्त पावसामुळे पाणी तुंबले : १४ सप्टेंबरपर्यंत मान्सून संपतो. यंदा मात्र पाऊस थांबला नाही. आजही अनेक खुल्या खाणींत पाणी तुंबले आहे. सायडिंगपर्यंत रस्ते खराब आहे. स्टॉक असूनही कोळशाचा पुरवठा होऊ शकला नाही.
3. अवलंबत्व वाढले : चीन, ऑस्ट्रेलियाऐवजी इंडोनेशियाहून कोळसा घेऊ लागल्याने कोळसा महागला. मोठ्या प्रकल्पांनी विदेशातून कोळसा मागवणे बंद केले. आता सर्वांना कोल इंडियाचा कोळसा हवा आहे.
4. प्रकल्पांची साठा कपात : कोरोनाकाळात कोळशाची वाहतूक वेगाने झाली. मागणीच्या २४ तासांत कोळसा मिळायचा. यामुळे प्रकल्प ७-१० दिवसांचा स्टॉक ठेवू लागले. नियमानुसार २२ ते २५ दिवसांचा स्टॉक हवा.

पॉवर एक्स्चेंजकडून महाग दराने विजेची खरेदी सुरू
महावितरणला वीजपुरवठा करणारे महानिर्मिती व खासगी क्षेत्रातील एकूण १३ संच बंद असल्याने ३३०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी महावितरणला ३,३०० मेगावॅट वीज पॉवर एक्स्चेंजकडून खरेदी करावी लागत आहे. खुल्या बाजारातून ७०० मेेगावॅट वीज १३ रुपये ६० पैसे दराने खरेदी केली जात आहे.

रोजची गरज १.३० लाख मेट्रिक टन, उपलब्ध ८० हजार
महानिर्मितीला दररोज किमान १ लाख ३० हजार मेट्रिक टन कोळशाची गरज भासते, मात्र आठवड्यापासून केवळ ८० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध झाला. रविवारी तो १ लाख ३ हजार मेट्रिक टनावर पोहोचला. कोळसा मिळत नसल्याने चंद्रपूर, भुसावळ, नाशिक, पारस, खापरखेडा या केंद्रांतील ५ संच बंद पडले आहेत.

पावसामुळे कोळशाचा पुरवठा प्रचंड घटला
वेस्टर्न कोलमिल लि.च्या माध्यमातून महानिर्मितीच्या संचांना कोळशाचा पुरवठा होताे. यंदा पाऊस लांबल्याने तसेच कोलमिलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने औष्णिक केंद्रांना कोळशाचा पुरवठा कमी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...