आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभा आयुर्वेद रथयात्रा:260 रुग्णांची मोफत तपासणीसह अग्निकर्म, विद्ध कर्म, बस्ती मर्मचिकित्सेबाबत केले मार्गदर्शन

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण महाराष्ट्रात जनमानसात आयुर्वेदाबाबत आस्था वाढावी म्हणून 2 डिसेंबर ते 5 जानेवारीदरम्यान रथयात्रा काढण्यात येत आहे. तसेच ही रथयात्रा 15 डिसेंबर गुरुवारी सकाळी 6.30 वाजता काव्यरत्नावली चौक ते शिवतीर्थ मैदान अशी काढण्यात आली. दरम्यान, 260 रुग्णांची मोफत तपासणीसह अग्निकर्म, विद्ध कर्म, बस्ती मर्मचिकित्सा आदींबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.

फुले उधळून रथयात्रेचे स्वागत

प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात वैद्य प्र. ता. जोशी (धुळे) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ काढण्यात आलेल्या रथयात्रेच्या मार्गात जिल्ह्यातील वैद्य व आयुर्वेदचे विद्यार्थी फलकाद्वारे आरोग्याची माहिती देत होते. काव्यरत्नावली चौक ते शिवतीर्थ मैदान या दरम्यान ही रथ यात्रा काढण्यात आली. रथमार्गात चौकाचौकात फुले उधळून या रथयात्रेचे स्वागत करण्यात येत होते. यात आयुर्वेदचे विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, शहनाई वादन, विविध वनस्पती दर्शन, आयुर्वेद ग्रंथ पालखी, आयुर्वेद रथ हे या रथयात्रेचे केंद्रबिंदू झाले होते. या रथयात्रेत जिल्ह्यातील सर्व वैद्य मंडळींसह आयुर्वेदचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

यांचा झाला गौरव

चिमुकले श्रीराम मंदिरात जिल्ह्यातील 65 वर्षांवरील 11 ज्येष्ठ आयुर्वेद वैद्यांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला. यात वैद्य सी. व्ही. त्रिपाठी, वैद्य पी. एस. चौधरी, वैद्य विकास गुळवे, वैद्य किशोर मोरे, वैद्य प्रभाकर चौधरी, वैद्य पी. जी. पिंगळे, वैद्य देवेंद्र शर्मा, वैद्य संतलालजी द्विवेदी, वैद्य उषा जगताप, वैद्य उषा जळूकर, वैद्य जगन्नाथ पाटील या 11 ज्येष्ठ आयुर्वेद वैद्यांचा गौरव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, दादा महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

वैद्यांतर्फे रुग्णांची मोफत तपासणी

सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान 260 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यात व्याधीचे निदान करून काही रुग्णांना पाच दिवसांची औषधी मोफत देण्यात आली. तसेच उपस्थित रुग्णांना अग्निकर्म, विद्ध कर्म, बस्ती मर्मचिकित्सा या विषयी माहिती देत स्वास्थ्य राहाण्यासाठी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...