आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जळगावकरांना बाेट टुरिझम करण्यासाठी वाघुर वर प्रकल्प;बेटावर प्रशस्त हाॅटेल, राज्यातील पहिला प्रकल्प जळगावात

प्रदीप राजपूत | जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या आलिशान हाऊसबाेट, बेटावरच्या टुमदार हाॅटेलचा आनंद घेण्यासाठी आता केरळ, काश्मीरला जाण्याची गरज नाही. जळगावपासून जवळच असलेल्या वाघूर धरणाच्या बॅकवाॅटरमध्ये पर्यटकांसाठी हा आनंद घेता येणार आहे. मुंबई वगळता महाराष्ट्रातील पहिले हाऊसबाेट पर्यटन जळगावात उपलब्ध झाले आहे. थ्री बीएचकेची व्यवस्था असलेले हाऊसबाेट साेबतच बेटावरील व्हिला, रेस्टाॅरंट लवकरच पर्यटकांसाठी खुले हाेणार आहे. वाघूर धरणावरील पर्यटन विकासासाठी शासनाकडून २२ काेटी रुपये उपलब्ध झाले आहेत. बीओटी तत्त्वावर धरणातील बेट विकसित केले जात आहे. इंटेरिअर डिझाइनर प्रेरणा चाैधरी यांनी हाऊसबाेटसह या बेटचे डिझाइन केले आहे.

येथे साकारतेय बेटावरचे पर्यटन
जामनेर-भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावापासून पश्चिमेला डाेहरी तांडाजवळ वाघूरचे बॅकवाटर आहे. तेथे २० ते २५ एकरचे बेट आहे. बेटावर इकाे टुरिझमच्या धर्तीवर बांबू हट तयार केल्या जात आहे. बांबुचेच खुले रेस्टाॅरंट, नऊ एसी हट उभारलेल्या आहेत. बांबू कामासाठी गुजरात येथून कारागीर आले आहेत. तर काेकणातील जांभा दगडापासून फाेर बीएचकेच्या तीन व्हिला या बेटावर साकारण्याचे काम वेगात सुरू आहे.

केरळच्या कंपनीकडून बाेटची बांधणी : केरळ येथील इनलॅड मरिन या कंपनीकडून हाऊसबाेट तयार करण्यात आली आहे. ही बाेट धरणात फिरत आहे. तर आणखी दाेन बाेटींचे काम धरणाच्या किनाऱ्यावर सुरू आहे. यासाठी केरळातील काेचीन, पश्चिम बंगालच्या काेलकाता येथून कारागीर आले आहेत. बाेटचे वजन ४५ टन असून, ३० टनापर्यंत स्टीलचा वापर केलेला असून, उर्वरित लाकूड व बांबूचे काम आहे.
शासनाकडून १२ काेटींचा निधी : धरणातील बेटावर पर्यटन विकसित करण्यासाठी एकूण २२ काेटी रुपयांच्या निधीची कामे केली जात आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून यावर काम सुरू झाले असून, हाऊस बाेटींच्या पर्यटन, बेटावरील रेस्टाॅरंट आणि अन्य पर्यटन विकसित करण्यासाठी शासनाकडून आणखी निधी मिळणार आहे. त्यामुळे येथील निसर्ग पर्यटन वाढण्यास मदत हाेऊ शकते.

तीन प्रशस्त, आलिशान हाऊस बाेट : वाघूर धरणाच्या बॅकवाॅटरमध्ये तीन प्रशस्त बाेट थांबणार आहेत. एका बाेटचे वजन जवळपास ४५ टन एवढे आहे. त्यात तळमजल्यावर तीन बेडरूम, एक छाेटा हाॅल आणि किचन आहे. प्रत्येक बेडरूमला बाथरूम अटॅच आहे. पहिल्या मजल्यावर तब्बल १०० फूट बाय १५ फुटाचा प्रशस्त असा हाॅल आहे. या बाेटवर पार्टीसाठी एकाच वेळी दीडशे लाेक राहू शकतात.

बेटावर असे जाता येणार
जळगावपासून नशिराबाद मार्गेे कुऱ्हा (पानाचे) येथे जावे लागते. पुढे भुसावळ-जामनेर रस्त्यावर गारखेडा गावाच्या अलीकडे पश्चिमेकडे एक कच्चा रस्ता जाताे. येथून पुढे डाेहरी तांडा या गावाच्या अलीकडे वाघूरच्या बॅकवाॅटरपर्यंत जाता येते. सध्या चारचाकी जात नाही. जळगावपासूनचे एका बाजूचे अंतर ४२ किमी आहे. हे क्षेत्र अजून पर्यटकांसाठी खुले झालेले नसून, येत्या सहा महिन्यांत ८० टक्के विकसित झालेले असेल.

बातम्या आणखी आहेत...