आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अमृत सरोवर अभियानांतर्गत 21 तलावांचे प्रस्ताव ; गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त देशात आजादी का अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर (तलाव) निर्मितीचे आवाहन केले आहे. जळगाव जिल्ह्यात अमृत सरोवर अभियानातंर्गत ५० प्रस्ताव आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात २१ तलावांच्या प्रस्तावाची या अभियानाच्या पोर्टलवर नोंद आहे. त्यात आठ तलावांसह चाळीसगाव तालुका आघाडीवर आहे. तर जळगावसह नऊ तालुक्यातून एकही प्रस्ताव अद्याप दाखल झालेला नाही. अमृत सरोवर अभियानात प्रत्येक जिल्ह्यात ७५ या प्रमाणे देशात ५० हजार अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येक अमृत सरोवर हे किमान एक एकर (०.४ हेक्टर) या आकारमानाने व किमान १० हजार क्युबीक मिटर पाणी साठवण्याची क्षमता असणारे असतील. या अभियानासाठी २४ एप्रिल ते १५ ऑगस्ट हा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. जे जिल्हे नवीन तलावांची निर्मिती करू शकणार नाहीत. त्यांनी अस्तित्वात असलेल्या तलावाचे पुनर्जिवन व गाळ काढणे अशी काम करून साठवण क्षमतेत वाढ करणे अपेक्षित आहे. अमृत सरोवराच्या निर्मितीसाठी जागेची निवड, कार्य प्रगतीचे संनियंत्रण व माहिती नोंदवण्यासाठी भास्कराचार्य राष्ट्रीय अंतराळ विकास व भूगणित-राष्ट्रीय (BISAG-N) यांनी ‘अमृत सरोवर’ हे संकेतस्थळ विकसीत केले आहे. अमृत सरोवराच्या निर्मितीनंतर त्याच्या सभोवती कडुलिंब, पिंपळ, वटवृक्षाची रोपे लावली जाणार आहेत. सन्मान वृक्षरोपण लागवड कार्यक्रम राबवण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. हे वृक्षारोपण स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शहिद झालेल्यांच्या परिवारातील सदस्यांद्वारे करण्यात यावे. यापैकी कोणीही उपलब्ध नसल्यास परिसरातील गावातील सर्वात ज्येष्ठ नागरिकाना विनंती करून त्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दरम्यान अमृत सरोवर अभियानामुळे जिल्ह्यात सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. तसे वृक्षारोपण अभियानामुळे देखील पर्यावरण रक्षणासाठी मोठा हातभार लागणार आहे.

अभियानात श्रमदानाच्या रुपाने लोकसहभाग अभियानात बांधकाम साहित्याचे दान, श्रमदानाच्या रुपाने लोकसहभाग नोंदवता येईल. सीएसआर सहभाग, जनतेकडून अर्थसहाय्य या उपक्रमासाठी घेता येणार आहे. त्यासोबतच गाव समितीला सरोवराचे सौंदर्यीकरण करावयचे असल्यास ते त्यासाठी आवश्यक तो निधी, अर्थसहाय्य जमा करू शकतील. सरोवराच्या निर्मिती दरम्यान निघणारा गाळ, मातीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असणार आहे.

जिल्ह्यातील २१ प्रस्ताव पोर्टलवर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या नरेगा अंतर्गत हा उपक्रम राबवला जातो आहे. ‘अमृत सरोवर’ उपक्रमासाठी ५० प्रस्ताव जिल्ह्यातून आले आहेत. मात्र, पोर्टलवर २१ प्रस्तावांची नोंद आहे. त्यात चाळीसगाव ८, जामनेर ५, अमळनेर ३, पाचोरा ३, भडगाव १, एरंडाेल १ यांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात नऊ तालुक्यातून प्रस्तावच नाही... जळगाव जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत ७५ अमृत सरोवरांची निर्मिती करावयाची असताना आतापर्यंत केवळ सहा तालुक्यातून २१ प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले. जळगाव, यावल, चोपडा, पारोळा, धरणगाव, मुक्ताईनगर, रावेर, बोदवड व भुसावळ या नऊ तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...