आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा६१ व्या महाराष्ट्र हाैशी राज्य नाट्य स्पर्धेतील अंतिम नाटक ‘पुन्हा सलवा जुडूम’ सादर झाले. अप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठान आणि खान्देश नाट्य प्रतिष्ठान या संस्थेतर्फे वरील प्रयाेग पार पडला. लेखक शरद भालेराव यांनी नवीन विषयाची परंपरा या वर्षी देखील चालू ठेवली. वेगवेगळे समाजमनाला भिडणारे विषय ते आपल्या नाटकातून मांडत असतात. आजच्या नाटकाचा विषय देखील मर्मभेदक असाच हाेता. अनेक वर्षांपासून भांडवलशाही व्यवस्थेने जी दरी निर्माण केलेली आहे. ती कदापि दूर हाेणे शक्य नाही. हा अनन्वित जुलूम असाच चालू राहणार आणि हा अत्याचार सामान्यपणे जगणारा माणूस हे उघड्या डाेळ्याने पाहत राहणार. या मुर्दाडपणाचे प्रतिनिधित्व करणारा सुबा या सामान्य जनतेचे शल्य प्रेक्षकांसमाेर मांडताे.
एका आदिवासी पाड्यावर काही दशकांपूर्वी घडलेले सत्य घटनाक्रम उलगडताे. बालण्णा आदिवासी जनतेचा कैवारी, पाड्यावरील त्याच्या बांधवांसहित राहत असतात. जंगलातील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्यांची गुजराण हाेत असते. सरकारकडून फतवा निघताे आणि एक अधिकारी ‘सलवा जुडूम’ घेऊन येताे. ही याेजना आदिवासींच्या भल्याची आहे असे भासवले जाते आणि नक्षलींची खबरबात यांनी पाेलिसांना द्यावी अशी अट त्यात असते; परंतु नक्षली आदिवासींना त्रास न देता राहत असतात. त्यांची मने ते जिंकतात. हे पाेलिस अधिकारी राठाेड यास मान्य नाही आणि ताे निष्पाप आदिवासींची हत्या करताे. यामध्ये बालण्णाची मानलेली मुलगी आणि किसूचे आई-वडील ठार मारले जातात. लेखक शरद भालेराव कथानक गुंफताना काही ठरावीक फाॅर्म्युले वापरतात. एक निडर स्त्री पत्रकार ती अनाथ असणे, भ्रष्ट पाेलिस अधिकारी राठाेड, ताे या अनाथ असलेल्या सीमाला बालण्णाची मुलाखत घेण्याच्या बहाण्याने जंगलात पाठवताे, तिच्यामार्फत माहिती मिळेल या हेतूने; परंतु सीमा बालण्णा आणि किसूची सत्य कहाणी ऐकून त्या दाेघांची साथ करायला तयार हाेते. किसूमध्ये तिची भावनिक गुंतवणूकदेखील झालेली असते.
या कहाणीला दिग्दर्शक चिंतामण पाटील माेठ्या खुबीने एकत्रित गुंफतात. आदिवासी नृत्य, जंगलातील काही दृश्य परिणामकारक ठरतात. तांत्रिक विभागावरदेखील चिंतामण मास्तरांची हुकूमत जाणवली. शिरीष शिरसाळे यांची प्रकाश याेजना नाटकास पुरक अशीच. प्रबुध्द भालेराव, कुणाल जाधव यांचे नेपथ्य नाट्याचा आशय खुलवणारे पार्श्वसंगीत, रंग व वेशभूषा दाेघेही उल्लेखनीय. सुबाच्या भूमिकेत अरुण सानप आपले अभिनव काैशल्य पणाला लावतात. गणेश साेनार यांचा बालण्णा भारदस्त; परंतु संहितेमध्ये वाव कमी. विकास वाघ यांनी अभिनयाच्या बाबतीत बाजी मारली. किसू त्यांनी भेदरतेने उभा केला. एकता असाेदेकर सुरूवातीला काहीशा दबलेला वाटल्या; परंतु दुसऱ्या अंकात त्या प्रभावी ठरतात. कुलदीप भालेराव आणि दिनेश राठाेड आपआपल्या भूमिका पार पाडतात. दिग्दर्शक चिंतामण पाटील आपल्या प्रदीर्घ अनुभवाने नाट्याचा विषय खुलवतात; परंतु काही कलाकारांवर अजून मेहनत घ्यायला हवी हाेती, नाटक अजूनही निश्चितच प्रभावी झाले असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.