आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:रेल्वे अपघात टाळण्यासाठी असतात 13 मीटरऐवजी 15 किमी अखंड रूळ, सिमेंटच्या स्लिपरमुळे घट्ट बसतात रुळ

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडी आणि तीव्र उन्हात रेल्वे रुळांचे आकुंचन आणि प्रसरण होते. त्याचा परिणाम रेल्वे अपघात होण्यात होतो. ते होऊ नये यासाठी १५ किलो मीटरपर्यंत अखंड रूळ ठेवण्याचे तंत्र रेल्वेने अंगीकारले आहे. हे अखंड रूळ प्रसरण अथवा आकुंचन पावू नयेत यासाठी त्यातील धातूंचे मिश्रण आणि रूळ निर्मितीच्या वेळचे तापमान यात बदल करण्यात आला.

रविवारी नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला अपघात झाला. नव्या तंत्रामुळेच डबे धडकण्याऐवजी एकमेकांपासून अलग झाल्यामुळे जीवितहानी कमी झाली; पण रूळ तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते आहे. त्या पार्श्वभूमीवर बदललेले रूळ तंत्रज्ञान हे अपघात कमी करण्यासाठीच बनले आहेत, हा मुद्दा समोर आला. इंग्रजांच्या काळापासून १३ मीटर लांबीचा एक रूळ आणि प्रत्येक रुळात अंतर ठेवण्याची पद्धत होती. हे अंतर रूळ आकुंचन आणि प्रसरण पावताना उपयोगाचे ठरत होते. रूळ प्रसरण पावण्यासाठी जागा नसेल तर ते वाकडे होण्याचा आणि त्यामुळे अपघाताचा धोका असतो. पण आता १५ किमी लांबीच्या अखंड रुळांमुळे हा धाेका कमी झाला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सिमेंटच्या स्लिपरमुळे घट्ट बसतात रुळ
नव्या तंत्रानुसार रुळाचा एक तुकडा आता २६० मीटरचा बनवण्यात येतो. १५ किमीपर्यंत हे तुकडे वेल्डिंग करून जोडलेले असतात. हे अखंड रूळ सिमेंटच्या स्लिपरवर घट्ट अडकवलेले असतात. हे स्लिपर २७० किलो वजनाचे आणि १० इंच जाडीचे असतात. त्याच्या खाली खडी असते. त्यामुळे ते घट्ट बसतात. परिणामी गाडीच्या डब्यांना हादरे बसत नाहीत आणि आवाजही फारसा येत नाही, असे रेल्वेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...