आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:साडेतीन लाख कामगारांच्या चेहऱ्यावर केळीच्या गाेडव्याने फुलले हसू

रावेर (प्रदीप राजपूत)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भावड्या... आेझंच चांगलं असतं, ते डाेक्यावर असलं की वितभर पाेटाची चिंता राहत नाही!
Advertisement
Advertisement

नुकत्याच नांगरटी केलेल्या शेतातील पायवाटेने पलीकडच्या मळ्यातून चार-पाच जण एकापाठाेपाठ धावत्या चालीने पावले टाकत डांबरी सडकेकडे येत हाेते. पन्नाशीचे पाठपोट एक झालेले प्रीतम भालेराव त्यांच्यापैकीच एक. आयुष्यभर केळ्यांचे घड वाहण्याचं काम केल्याने डोक्यावरचे केसही गायब झालेले. केळ्याच्या डागांनी कळकट पांढरा शर्ट तांबडा झाला होता. ‘डाग अच्छे होते है’ म्हणत हास्यविनोद करणारे भालेराव कोरोना आणि लॉकडाऊनचा विषय काढताच गंभीर झाले. बालवयात शाळा सुटून केळी कामगार म्हणून त्यांंच्या डोक्यावर आलेलं केळ्याचं ओझं त्यांना गेले तीन महिने कपड्यावरच्या डागांप्रमाणेच ‘अच्छे’ वाटू लागले आहेत. म्हणाले, ‘भावड्या, आेझंच अव्वल (चांगलं) असतं, ते डाेक्यावर असलं की वितभर पाेटाची चिंताच राहत नाहीस.’ त्यांच्या या एका जळजळीत वाक्यानं गेल्या तीन महिन्यांची चिंता स्पष्ट केली. 

तीन महिन्यांपासून थांबलेले अर्थचक्र रुळावर

रावेर-यावल या केळी पट्ट्यात तब्बल साडेतीन लाख नाेंदणीकृत केळी कामगार आहेत, केळीची लागवड, कापणी, वाहतूक, वाहनांमध्ये पॅकेजिंग अशी वेगवेगळी कामे आणि त्यानुसार त्यांचा माेबदला ठरलेला असताे. सर्व कामगारांना सरासरी २०० ते ४०० रुपयांपर्यंत मजुरी मिळते. रावेर, सावदा, फैजपूर, निंभाेरा, चाेपडा, मुक्ताईनगर, मस्कावद येथून दरराेज हजार- बाराशे ट्रक जम्मू, छत्तीसगड, लखनऊ, दिल्ली, चंदिगड, कोलकाता, भाेपाळपासून संपूर्ण भारतभर जातात. केळी कामगार, केळी सप्लायर कंपन्या, ट्रान्सपाेर्ट या सर्वांचे दैनंदिन शंभर काेटी रुपयांचे अर्थचक्र तीन महिन्यांपासून थांबले हाेते. गेल्या आठवड्यापासून ही गाडी पुन्हा रुळावर आलीय. परिसरात काेराेनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, पण अर्थचक्र रुळावर आल्याने केळीचा गाेडवा पुन्हा परतला आहे.

Advertisement
0