आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नेहमी ‘दंगल’ होणाऱ्या रावेरमध्ये विसर्जनाला घडले ‘मंगल’

रावेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर येथील मण्यारवाडा भागातील मशिदीवरून गणराय व गणेशभक्तांवर पुष्पवृष्टी करताना मुस्लिम बांधव. - Divya Marathi
रावेर येथील मण्यारवाडा भागातील मशिदीवरून गणराय व गणेशभक्तांवर पुष्पवृष्टी करताना मुस्लिम बांधव.

जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात २१ मार्च २०२० रोजी ४० वी धार्मिक दंगल झाली. सव्वासहा कोटी रुपयांच्या मालमत्तांचे नुकसान झाले. ३७७ आरोपींवर गुन्हे दाखल झाले. त्या सर्व आरोपींकडून दंगलीत नष्ट झालेल्या मालमत्तेची नुकसानभरपाई करण्याची कारवाई जून २०२० मध्ये सुरू झाली आणि यंदा परिस्थिती पार बदलली. नेहमीच ‘दंगल’ घडणाऱ्या या शहरात रविवारी ‘मंगल’ घडले. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर मशिदीतून चक्क पुष्पवृष्टी झाली.

ज्या दिवशी देशभर लाॅकडाऊन सुरू झाले त्या दिवशी म्हणजे २१ मार्च २०२० रोजीही तिथे रस्त्यावर नमाज पठण करण्याच्या कारणावरून भीषण धार्मिक दंगल झाली होती. तिथल्या पोलिस नोंदीनुसार ही गेल्या काही वर्षांतील ही रावेरमधील ४० वी दंगल होती. त्यानंतर प्रशासनाने हे दंगल प्रकरण इतक्या गांभीर्याने घेतले की आता तिथे ‘मंगल’ वातावरणाची अनुभूती यायला लागली आहे. रविवारी गणपती विसर्जनाची मिरवणूक मण्यारवाड्यातील मशिदीजवळून गेली. त्या वेळी मशिदीतून मिरवणुकीवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. २०१२ च्या डिसेंबर महिन्यात या मशिदीजवळून प्रेतयात्रा नेली म्हणून दंगल झाली होती हे विशेष.

दंगलीत ६ कोटी २० लाखांचे नुकसान
रावेर शहरात २० मार्च २०२० रोजी दंगल झाली. त्यात ६ कोटी २० लाख ९१ हजार ५९ रुपयांचे मालमत्तांचे नुकसान झाले. त्यात जाळपोळ केल्याने ४ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी एकूण ६ गुन्हे दाखल झाले. ३७७ आरोपींवर गुन्हे दाखल झाले. या मालमत्तेची हानी या सर्व आरोपींकडून भरून काढण्यासाठी त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली असून प्रशासनाकडून जप्तीची कारवाई सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...