आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हतनूरच्या कालव्यातून यंदा आठ नदीनाल्यांत ५० दलघमी पाण्याचे पुनर्भरण; जलपातळीही वाढणार

जळगाव/भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ विभागासह जिल्ह्याला संजीवन ठरलेल्या हतनूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून प्रतिदिन २०० क्युसेक वेगाने पुनर्भरणासाठी विसर्ग सुरू आहे. यामुळे यावल व चोपडा तालुक्यातील तब्बल आठ ठिकाणच्या नदी नाल्यांमध्ये पुनर्भरणाचे नियोजन आहे. संपूर्ण पावसाळ्याचा विचार करता यंदा किमान ५० दलघमी पाण्याचे पुनर्भरण करण्याचे नियोजन आहे.

हतनूर धरणातून तापी नदीत पाणी सोडले जाते. सोबतच हतनूरच्या उजव्या तट कालव्यातून देखील विसर्ग केला जातो. उजव्या तट कालव्यावरील या विसर्गाद्वारे यंदा वनोली कोसगाव जवळील मोर नदी, निमगाव टेंभी जवळील राजोरा नाला, साकळी-मनवेल जवळील भोनक नदी, यासोबतच धानोरा, अडावद परिसरात गुळ नदी, चहार्डी गावाजवळ रत्नावली व पंचावती, तर धुपे येथे हातेड नाल्यात पुनर्भरण नियोजित आहे. यातील काही नदी नाल्यांचे प्रत्यक्षात पुनर्भरण सुरू झाले आहे.

दरम्यान, हतनूरच्या उजव्या कालव्यावर क्रॉस झालेल्या नदी नाल्यांवर आऊटलेटची सुविधा आहे. सध्या याच आऊटलेटमधून नदी नाल्यांमध्ये पाणी सोडले जाते. पुनर्भरण झाल्यानंतर हेच पाणी नदीनाल्यांमधून पुन्हा तापीला मिळते. तत्पूर्वी, पुनर्भरणामुळे कालवा परिसरातील गावांची जल पातळी वाढण्यास मदत होते.

मागणीनुसार विसर्ग करणार, शेतकऱ्यांना माेठा लाभ
हतनूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पुनर्भरण सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे आवर्तन सोडले जाईल. नदी नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी बंधारे उभारले आहेत. त्यात पाणी साठवून भूजल पातळी वाढेल. विहिरी व कूपनलिकांमध्येही शेतकरी पुनर्भरण करू शकतील. याद्वारे धरणाच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग होईल.
-एस.जी.चौधरी, शाखा अभियंता, हतनूर धरण

बातम्या आणखी आहेत...