आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता:हनुमान चालिसाचे एकाच मंदिरात पठन, एकाच मशिदीवरून पहाटे झाली अजान; शांतता दोन हजार पोलिस, 1400 गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांचा मशिदींबाहेर बंदोबस्त

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशीदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवण्याचे आवाहन केल्यानंतर बुधवारी जळगाव शहरात शनिमंदिरात सहा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्यात आली. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मौलवीने चुकून पहाटे अजान दिली. या मौलवीस पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता चुकीने झाल्याचे सांगत त्याने माफी मागितली. या शिवाय जिल्ह्यात काहीच घडामोडी झाल्या नाहीत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन हजार पोलिस व १४०० गृहरक्षकांचा मशीदींबाहेर बंदोबस्त लावण्यात आला आहे.

भोंगे उतरले नाहीत तर मशीदींच्या बाहेर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असे आवाहन राज ठाकरेंनी एक मे रोजी औरंगाबाद येथील सभेत मनसेच्या कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तणावाचे वातावरण आहे. बुधवारी प्रत्यक्ष कृती होणार असल्यामुळे मंगळवापासून पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या होत्या. मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे सांगितले होते. नियमानुसार परवानगी घेणाऱ्यांना लाऊडस्पीकर वाजवू देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली होती.

त्यानुसार, जिल्ह्यात केवळ जळगाव शहरातील कार्यकर्त्यांनी परवानगी घेतली. सहा कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी ६.३० वाजता शनी मंदिरात हनुमान चालिसा म्हटली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त होता. राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी शहरात तैनात आहे. पोलिस, गृहरक्षक दलाचे कर्मचारी २४ तास धार्मिक स्थळांच्या बाहेर बंदोबस्त देत आहेत. कोणीही कोणाच्या भोंग्याच्या आवाजाविरुद्ध तक्रार केली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...