आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाज मर्या. जळगाव (मविप्र) मध्ये शिक्षण सेवकांच्या 55 पदांसाठी केलेली भरती बेकायदेशीर आहे. बनावट कागदपत्रे देऊन संबधितांना नियुक्तीपत्र दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा.
या भरतीसाठी नीलेश भोईटे यांनी 60 जणांकडून प्रत्येकी 30 लाख रुपये प्रमाणे 20 कोटी रुपये उकळल्याचा आरोप अॅड. विजय भास्कर पाटील यांनी बुधवारी केला. या आशयाचे निवेदन त्यांनी शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांना दिले.
मविप्रतर्फे शिक्षण सेवक भरतीची जाहिरात 4 सप्टेंबर 2022 ला प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानंतर भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच डॉ. बच्छाव यांनी स्थगिती दिली होती. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयाच्या निर्णयानुसार शिक्षण सेवक भरती पवित्र प्रणालीच्या मार्फत भरण्याचे आदेश करण्यात आले आहेत. त्यामुळे मविप्रने दिलेली जाहिरात बेकायदेशीर असल्याचा शेरा डॉ. बच्छाव यांनी 15 सप्टेंबर रोजी दिला होता.
शिक्षणाधिकारी कार्यालयाची फसवणूक
‘मविप्र’ने तात्काळ वृत्तपत्रातुन भरती रद्द केल्याची जाहिरात देऊन खुलासा करावा असे आदेश डॉ. बच्छाव यांनी दिले होते. तरी देखील नीलेश भोईटे यांनी ही प्रक्रिया पुर्ण करुन संबधितांना बनावट कागदपत्र, रेकॉर्ड, खोटे मुलाखती घेतल्याचे दाखवून कथीत उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे. संस्थेच्या त्या - त्या शाखेवरील प्रभारी मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक आमिष देऊन त्यांना संस्थेच्या शाखांवर कार्यरत असल्याचे दाखवले आहे. हे शिक्षक शाळांमध्ये काम करीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. अशा प्रकारे भोईटे यांनी शासनाची व शिक्षणाधिकारी कार्यालयाची फसवणूक केली असल्याचे निवेदन अॅड. पाटील यांनी दिले आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बच्छाव यांनी स्वत: फिर्याद देऊन फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अॅड. पाटील यांनी केली आहे.
अन्यथा शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा
ही भरती प्रक्रिया बेकायदेशीर असल्याची तक्रार सप्टेंबर महिन्यात केली होती. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. आता भरती प्रक्रिया संपवून संबधित शिक्षक काम करीत असल्याचे दाखवले जाते आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद देणे अपेक्षीत आहे. त्यांनी दखल घेतली नाही तर मी स्वत: शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करणार आहे.
- अॅड. विजय पाटील
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.