आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताफा मोहिमेवर:जप्त 38 टन प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया; मनपाच्या तिजोरीत 11 लाखांची भर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन व साठा करणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेली कारवाई पालिकेच्या पथ्यावर पडली आहे. गेल्या आठवड्यात जप्त केलेल्या ३८ टन प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी दिल्यानंतर त्यातून महापालिकेला ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. बाजारभावानुसार या मालाची किंमत ७० लाख होती. दोन वर्षांत पालिकेच्या तिजाेरीत सुमारे १५ लाख रुपये या कारवाईतून जमा झाले.

महापालिकेने गेल्या सात दिवसांपासून शहरातील प्लास्टिक उत्पादक, विक्रेते व वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. ४ जून राेजी एमआयडीसीतील डी ५५मध्ये छापा टाकला होता. त्या ठिकाणी गोदामात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक ग्लास व प्लेटचा साठा जप्त केला होता. या मालाची मंगळवारी मोजणी केली असता ३८ टन ७०५ किलो वजनाचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. पालिकेने हा संपूर्ण माल पुनर्प्रक्रियेसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या बियाणी पॉलिमरला दिला. जोपर्यंत १०० टक्के प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर व निर्मिती बंदी होणार नाही, तोपर्यंत ही कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या मोहिमेमुळे मंगळवारी कॅरीबॅग वापराचे प्रमाण तुरळक होते.

३४ ट्रॉली मालाची वाहतूक
जळगाव महापालिकेने केलेली ही कारवाई महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते आहे. त्यात जप्त ३८ टन माल वाहतुकीसाठी पालिकेच्या १२ ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. ३४ फेऱ्यांतून संपूर्ण मालाची वाहतूक करण्यात आली. आरोग्य, अतिक्रमण विभागाच्या ७९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

कारवाई टाळण्यासाठी दबावतंत्र
मोठ्या प्रमाणात साठा असल्याने त्यातील काही माल परत मिळावा यासाठी व्यापाऱ्याकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांकडून काही तडजोड करता येते का? यादृष्टीने प्रयत्न सुरू होते.

पालिकेने वाढवून घेतला दर
महापालिकेने यापूर्वी १३ ते १८ रुपये प्रति किलाे या दराने पुनर्प्रक्रियेसाठी जप्त साठा दिला होता; परंतु अनिल गेरडा यांच्या गाेदामात जप्त मालाची गुणवत्ता चांगली असल्याने आराेग्य विभागाने दर वाढवून मागितल्याने २९ रुपये प्रति किलाे दर मिळाला. यामुळे पालिकेच्या तिजोरीत ११ लाख २२ हजार ४४५ रुपये जमा झाले.

व्यापाऱ्याला ७० लाखांचा फटका : किरकाेळ बाजारात १८० ते २५० रुपये प्रति किलो दराने कॅरीबॅगची विक्री होते. ३८ टन माल किमान १८० रुपये प्रति किलोने विक्री केली तर ६९ लाख ७० हजार रुपये उत्पन्न मिळाले असते. या कारवाईमुळे व्यापाऱ्याला फटका सोसावा लागला. आठवडाभरात तीन कारवाया केल्याने मंगळवारी किरकोळ व होलसेल विक्रेत्यांची बहुसंख्य दुकाने बंद होती.

बातम्या आणखी आहेत...