आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62 वर्षांपासून सुरू असलेले रेल्वे गेट बंद:पिंप्राळा, भोईटेनगर, प्रेमनगरवासीयांना प्रतिक्षा आता उड्डाणपूलाची

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंप्राळा रेल्वे गेट 12 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आले. हे रेल्वे गेट गेल्या 62 वर्षांपासून भोईटेनगर, प्रेमनगरवासीयांसह परिसरातील नागरिकांना पलीकडे जाण्या-येणाऱ्यांसाठी सोईचा व जवळचा मार्ग बंद झाल्याने येथील नागरिकांना उड्डाण पुलाचे काम पूर्ण होण्याची प्रतिक्षा राहणार आहे. मात्र, तोपर्यंत परिसरातील नागरिकांना शिवाजीनगर उड्डाणपूल व बजरंग बोगद्यातून वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध आहे.

रेल्वे प्रशासनाने देशभरातील रेल्वे गेट बंद करून येथे उड्डाण पूल वा भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार जळगावातील आसोदा व पिंप्राळा रेल्वे गेटलगत उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या नुसार 1960 पासून सुरू असलेले पिंप्राळा रेल्वे गेट सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

रिंग रोडला दिलासा

पिंप्राळा रेल्वे गेट सुरू होते तेव्हा मालधक्क्यावरील संपूर्ण वाहतूक ही रिंग रोड वरून होत होती. ही वाहतूक जड वाहनांची असल्याने रिंग रोडवासीयांना आता जोपर्यंत या गेटवरील उड्डाण पूल तयार होत नाही तोपर्यंत धूळ व आवाजाच्या प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आता मालधक्क्यावरील मालाची वाहतूक निमखेडीकडे जाणाऱ्या जुन्या महामार्गाच्या रस्त्याकडून गुजराल पेट्रोल पंपाकडे होणार आहे.

दिवसभरात 60 वेळा गेट बंद

पिंप्राळा रेल्वे गेट मधून मुंबई, पुण्याकडे जाणार्‍या व येणार्‍या रेल्वे गाड्यांसह मालवाहतुकीच्या गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिवसभरात हे रेल्वे गेट 60 वेळा बंद राहत होते. त्यामुळे या गेटवर अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत असे. मात्र, हा उड्डाण पूल तयार झाल्यावर रेल्वेमुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही. तोपर्यंत पिंप्राळा, भोईटेनरगर व प्रेमनगरातील नागरिकांना बजरंग बोगदा व शिवाजीनगर उड्डाण पुलाचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...