आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिक्षेने प्रवास करीत असलेल्या जळगावकरांसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर वाहतूक शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, महापालिका यांनी एकत्रितपणे सर्वेक्षण करून प्रतिव्यक्ती भाडे निश्चित करून दिले आहे. शेअरिंग रिक्षांसाठी हे भाडे असणार आहे. मीटरच्या रिक्षांसाठी वेगळे भाडे व नियम निश्चित करण्यात आले आहेत. रेल्वेस्थानक ते गणेश कॉलनी प्रतिव्यक्ती रिक्षाभाडे ११ तर शिव कॉलनीचे १२ रुपये आहे.
रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये भाड्यावरून अनेकवेळा वाद होतात. हाणामारी झाल्याचेही प्रकार समोर आले आहेत. रात्री रिक्षाचालकांकडून लूट होते अशाही शेकडो तक्रारी पोलिस, आरटीओंकडे आहेत. अशात जिल्हा प्रवासी वाहतूक समितीने नोव्हेंबर २०२१ मध्ये एकत्रित बैठक घेऊन शेअरिंग रिक्षांसाठी भाडे निश्चित केले आहे. त्यानुसार रिक्षाचालक पैसे घेत असल्याचे एका संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. तर प्रशासनाने घालून दिलेले नियम, आदेशानुसार रिक्षाचालकांनी वागावे अशी अपेक्षा प्रशासनाची आहे.
सर्वेक्षणानुसार रेल्वेस्थानक ते गणेश कॉलनीपर्यंत ११ रुपये, शिवकॉलनी १२, महाबळ २०, गुजराल पेट्रोल पंप २१, गिरणा टाकी २०, रामानंदनगर २१, रायसेनीनगर २४, बांभोरी स्टॉप ३५, देवकर कॉलेज ३६ रुपये यासह सर्व मार्गांवरील भाडे निश्चित केले आहे. नागरीकांनी याच पद्धतीने भाडे द्यावे अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.
महापालिकेने लावले नाहीत शहरात फलक
उपप्रादेशिक परिवहन विभागाने भाडे निश्चित केल्यानंतर महापालिकेस पत्र दिले आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक व टॉवर चौक या तीन प्रमुख ठिकाणांवरून शहरातील निश्चित झालेल्या भाडे आकारणीचे सूचना फलक रिक्षा स्टॉपवर लावायला त्यात सांगितले होते; परंतु मनपाने फक्त जुने बसस्थानक येथेच असा फलक लावला आहे. इतर कोणत्याही ठिकाणी फलक नसल्याने नागरिकांना या दराची कल्पनाच नाही, असे समोर आले.
मनपाचे अधिकारी म्हणतात माहिती घेऊन सांगतो
महापालिकेचे शहर अभियंता जावळे यांना रिक्षाभाडे संदर्भातील फलकांबाबत विचारणा केली असता त्यांना हा विषय माहीत नसल्याचे समोर आले. दोन जून रोजीच पदाभार घेतला असल्याने
या संदर्भातील अधिक माहिती घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
ठरवून दिलेले भाडे घेतो
शेअर पद्धतीत जर एकच प्रवासी मिळाला तर त्याला घेऊन जावे लागेल. यात रिक्षाचालकाचे नुकसान होईल. प्रशासनाने ठरवून दिलेल्या भाड्याप्रमाणेच आम्ही आकारणी करीत आहोत. रिक्षाचालक प्रवाशांची लूट करीत नाही.
-दिलीप सपकाळे, जिल्हाध्यक्ष: वीर सावकर रिक्षा युनियन, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.