आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सालंकृत झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांची हाळे खिळखिळी झाली आहेत. अलीकडेच रस्त्यांची कामे सुरू झाल्याने काहीअंशी दिलासा मिळाला. मात्र, पांडे डेअरी ते नेरीनाका चौक रस्त्यावर २० लाख रुपये खर्चाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी हा रस्ता पुन्हा खाेदावा लागणार आहे. महापालिकेने वाहनधारकांची जणू थट्टाच चालवल्याचा हा प्रकार आहे.
शहरातील रस्त्यांची कामे सुरू होणार हे दोन महिन्यांपूर्वीच निश्चित होते. डांबरीकरणाची कामे होणार असल्याने रस्त्यावरील अतिक्रमण असो की अन्य जलवाहिनींची कामे वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना होत्या; परंतु या सूचना व आदेशाचा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर किंचित सुद्धा परिणाम झालेला दिसत नाही. शहरातील प्रचंड वर्दळ असलेल्या प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या पांडे डेअरी चौक ते नेरीनाका चौकादरम्यान मक्तेदाराकडून रस्त्याचे डब्ल्यूबीएम व एमपीएमचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ बीएम, कारपेट व सीलकोट याच कामाची पूर्तता करणे शिल्लक असताना अमृत योजनेंतर्गत टाकलेल्या मुख्य जलवाहिनीला गळती असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च झालेला रस्ता पुन्हा जेसीबीने खोदण्याची वेळ येणार आहे.
किती दिवस त्रास सोसावा : शहरातील प्रमुख वर्दळीच्या मार्गापैकी नेरीनाका ते स्वातंत्र्य चौक हा एक रस्ता आहे. रात्रंदिवस या मार्गाने वाहतूक सुरू असते. सुमारे दीड कोटी रुपये खर्च असलेल्या रस्त्याचे दोन तुकड्यात काम सुरू आहे. पांडे डेअरी ते नेरीनाका चौक रस्त्यावर २० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. सध्या खिळखिळा झालेल्या रस्त्यावरून नागरिकांना त्रास सोसावा लागतोय. रस्त्याचे काम जलदगतीने होऊन अनेक वर्षांपासून यातना सोसणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे; परंतु प्रशासनातील नियोजनशून्य कारभारामुळे वाहनधारकांना त्रासाचा सामना करावा लागतो आहे.
वॉशआऊटला उशीर, कामावर परिणाम
पांडे डेअरी चौक- नेरीनाकामार्गे वाल्मीक नगरातील पुतळ्यापर्यंत ३५० मीमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीतून एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येला पुरवठा होणार आहे. दोन महिन्यापेक्षा आधी जलवाहिनी टाकलेली असताना पाच दिवसांपूर्वीच जलवाहिनी वॉशआउटची प्रक्रिया करण्यात आली. त्यात दोन ठिकाणी गळती असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दोन दिवसांत दुरुस्तीचे काम
या रस्त्यावरून पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी जलवाहिनी वॉशआऊटचे काम हाती घेण्यात आले होते. त्यात दोन ठिकाणी गळती असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. -पंकज बऱ्हाटे, अभियंता, जैन इरिगेशन कंपनी
गळती दुरुस्ती करावी लागणार
मुख्य जलवाहिनी असल्याने डीआय व एचडीपी पाइप टाकण्यात आले आहेत. अंतिम टेस्टिंग झालेली नसल्याने ती करण्यात आली. त्यात गळती असल्याचे दिसल्याने त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. पुन्हा रस्त्याचे खाेदकाम करावे लागेल. हे काम अमृत याेजना मक्तेदारामार्फत पूर्ण करू. -आर.टी. पाटील, अभियंता मक्तेदार
काम थांबवण्याबाबत महापालिकेने काहीही कळवलेले नाही
नेरीनाका ते स्वातंत्र्य चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. काही अडचणी दूर होताच कामाला सुरुवात होईल. काम थांबवण्याबाबत सूचना नाहीत. - अभिषेक पाटील, मक्तेदार, रस्त्याचे काम
४२ कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे तीन दिवसांत सुरू होणार
जळगाव | गेल्या दोन वर्षांपासून केवळ मंजुरी आणि चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असलेल्या ४२ कोटींच्या निधीतून करण्यात येणाऱ्या ४९ प्रमुख रस्त्यांच्या कामाला येत्या तीन दिवसांत सुरुवात होईल. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली. राज्य शासनाने नुकतीच स्थगिती उठवलेल्या ४२ कोटींच्या निधीतून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आला. यातून ४९ रस्त्यांचे बळकटीकरण केले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.