आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकाच्या कानाचे कुत्र्याने तोडले लचके:एआरसी इंजेक्शनअभावी रुग्णाची फिरवाफिरव; 14 तासांनी जीएमसीत उपचार

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.

सायंकाळी अंगणात खेळत असताना नऊ वर्षीय बालकाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत कानाचे लचके तोडले. बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या ठिकाणी प्राथमिक उपचार करून इंजेक्शन नसल्याने परत पाठवण्यात आले. दरम्यान, इंजेक्शन नसल्याने तब्बल १४ तासांनंतर बालकाला अधिष्ठातांच्या सूचनेनुसार जीएमसीत तत्काळ आपत्कालीन विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील यश महेंद्र सोनवणे (वय ९) या लहान मुलावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता कुत्र्याने जबर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने या मुलाचा कान व चेहऱ्याला चावा घेत जखमी केले. अर्धा कान लटकलेल्या अवस्थेत वडील महेंद्र सोनवणे यांनी यशला उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात रात्री ८ वाजता आणले. या वेळी त्यांनी १० ते १२ टाके टाकून प्राथमिक उपचार केले. मात्र, एआरसी इंजेक्शन नसल्याने दाखल करण्यास नकार दिला. विनंती करून देखील यशला तेथे दाखल न केल्याने रात्री ११ वाजता त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, या ठिकाणी दाखल करण्याची व्यवस्था नसल्याने गोदावरीत जाण्याचा सल्ला दिला. अखेर कुठेच इंजेक्शन व उपचार मिळत नसल्याने रात्री १२ वाजता मुलाला विना उपचाराने घरी नेण्यात आले.

रविवारी सकाळी पुन्हा पालकांनी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात घेऊन जात डॉक्टरांना विनवणी केली. मात्र, इंजेक्शन नसल्याचे कारण देत यशला परत पाठवण्यात आले. अखेर पालकांनी जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी संवाद साधत परिस्थिती सांगितली. यानंतर बालकाला जीएमसीत दाखल करत उपचार सुरू करण्यात आले.

अधिष्ठातांनी केली विचारपूस
जिल्ह्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभागात (नेत्रकक्ष) दररोज कुत्रा चावला म्हjaणून औषधोपचारासाठी रुग्ण येत आहेत. रविवारी दुपारी १.३० वाजता यशला रुग्णालयात दाखल केले. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी तत्काळ त्याला आपत्कालीन कक्षात पाठवून इंजेक्शन उपलब्ध करून देत औषधोपचार केले. सायंकाळी अधिष्ठातांनी बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुलाच्या उपचारासाठी डॉ. अजय सोनवणे, डॉ. सतीश सुरळकर, डॉ. अश्विनी, परिचारिका यास्मिन शेख, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...