आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधरणगाव शहरात पत्ता विचारतांना झालेल्या गैरसमजातून काही नागरिकांनी एका तरुणाला मुले पळवणारा समजून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. परंतु संपूर्ण चौकशीअंती तसा प्रकार नसल्याने पोलिसांनी संबंधित व्यक्तीस सोडून दिले. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धरणगाव पोलिसांनी केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज सकाळी बालाजी मंदिर परिसरात धुळे येथील एक व्यक्ती पत्ता विचारण्यास थांबला. तो व्यक्ती थोडा बोबडा बोलत असल्यामुळे त्याची भाषा कळाली नाही. त्या व्यक्तीने डफलेवाले विचारले असता एका महिलेला डब्बेवाले ऐकू आले. त्याचवेळी तिथे एक लहान मुलगा उभा होता. संबंधित महिलेने तुमच्याकडे आले आहेत, घरी घेऊन जा, असे सांगितले. थोडे पुढे जात नाही, तोपर्यंत त्या मुलाची आई समोरून आली आणि त्यांचा मुलाला पळवून घेऊन जात असल्याचा संशय निर्माण झाला.
पोलिस ठाण्यात नेले
काही नागरिकांनी लागलीच त्या व्यक्तीला पडकून पोलीस स्थानकात जमा केले. पोलिसांनी चौकशी केली असता, तो व्यक्ती धुळे येथील असल्याचे कळाले. तसेच त्याचे जे धरणगाव तालुक्यातील नातेवाईक होते, त्याच्याकडून देखील माहिती घेतली. यानंतर त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान या प्रकारच्या अफवा राज्यभरात सुरू आहेत. काही ठिकाणी मारहाणीचे प्रकार देखील घडले आहेत.
अफवांवर विश्वास ठेऊ नका-पोलिस
मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीचे सोशल मीडियावर अफवांचे पीक आले आहे. अनेकांकडून ग्रुपवरील मेसेज खात्री न करता फॉरवर्ड केले जात आहेत. त्यामुळे अफवा वाढीस लागल्या आहेत. नागरिकांनी अफवेचा कोणताही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नये. त्याशिवाय मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांसह पालकांनीही योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे.
पालकांनी काळजी घ्यावी
तसेच, संशयास्पद व्यक्तींसदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांसोबत संपर्क साधावा. शालेय प्रशासनानेही या पाश्र्वभूमीवर खबरदारी घ्यावी. मुलांना शाळे सोडतांना घरी नेण्यासाठी पालकांनी देखील काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.