आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकापसाच्या दरात सुरू असलेली घसरण अजूनही सुरूच आहे. रुईला मागणी नसल्याने सरकीने कापसाचे दर स्थिर ठेवले हाेते; परंतु सरकीच्या दरात गेल्या महिन्याभरात ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे कापसाचे दर कमी हाेऊन प्रतिक्विंटल ७७०० रुपयांवर आले आहेत. जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन कमी झाल्याचा अंदाज जाहीर करीत अनेक स्वयंघाेषित बाजारतज्ज्ञांनी कापसाच्या भावात वाढ हाेणार असल्याचे चित्र रंगवले हाेते.
दरम्यान, गेल्या महिन्यात ९ हजार रुपयांचा उच्चांक गाठलेले कापसाचे दर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात ७७०० रुपयांच्या नीचांकावर आले. जागतिक पातळीवर अपेक्षित मागणीच नसल्याचे सध्या कापसाचे दर घसरले आहेत. सरकीला असलेली मागणी या महिन्यात अचानकपणे कमी झाली आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रतिक्विंटल ४ हजारांचा दर असलेली सरकी फेब्रुवारीत ३१०० ते ३२०० रुपयांच्या पातळीवर आली आहे. कापसाच्या अस्थिर बाजाराचा सर्वाधिक फटका जिनिंग उद्याेगाला बसताे आहे.
रुईसाेबतच सरकीला मागणी नसल्याने महागडा कापूस अंगावर पडताे आहे. सरकीत ८०० रुपयांची तर कापसाच्या गाठींमध्ये ५ हजार रुपयांनी भाव घसरून ६० हजार रुपये प्रति गठाणवर आले आहेत. त्यामुळे जिनिंग चालकांचे धाबे दणाणले. खान्देशातील ८० टक्के जिनिंग कारखान्यांत जिनिंग प्रक्रिया थांबल्याची स्थिती आहे. मात्र, असे असले तरी अजूनही शेतकऱ्यांनी कापसाचा माल विक्रीसाठी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे जळगावातील व्यापारी सांगताहेत.
भावात अस्थिरता
कापसाच्या बाजारपेठेत यंदा अधिक अस्थिरता आहे. भावात घसरण हाेत आहे. सरकी आणि गाठींच्या दरातही घसरण झाली आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस माेठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याचे चित्र दिसते आहे. हर्षल नारखेडे, जिनिंग उद्याेजक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.