आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात्रीचा ग्राउंड रिपोर्ट:प्रांतअधिकारी, तहसीलदारासह एसडीआरएफची टीम तैनात; प्रशासन सात्रीकरांच्या पाठीशी, पूर ओसरेपर्यंत सर्व सेवा देऊ - प्रांतअधिकारी

वसंतराव पाटील, पाडळसरेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैद्यकीय पथकाने केली सायंकाळ पर्यंत २४१ रुग्णांची व १६४ जनावरांची तपासणी व औषधोउपचार

बेजबाबदार व ढिम्म प्रशासनामुळे धड पुनर्वसनही होत नाही आणि समस्याही सुटत नाहीत. समस्येवर समस्या त्यातही ताप सर्दी खोकल्याची साथ सुरू असलेल्या सात्री गावाला बोरीनदीला आलेल्या पुरामुळे चार दिवसांपासून संपर्क तुटला आहे. दरम्यान, गावात मंगळवारी १३ वर्षीय आरुषीची उपचाराविना मृत्यु झाल्याची घटना घडली. संतप्त ग्रामस्थानी मयत आरुषीचे प्रेत थेट प्रांत कार्यालयात आणले होते. शासनाचा तीव्र निषेध करीत लेखी आश्वासन घेऊन प्रांत व तहसीलदार यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

याच पार्श्वभूमीवर प्रांतआधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पुनर्वासन् समिती सदस्य महेंद्र बोरसे, वैद्यकीय व पशुवैद्यकीय पथक यांच्यासह एसडीआरएफचे ३७ जवानांचे पथक बोट सह दाखल प्रगणे डांगरी येथे दाखल झाले. दरम्यान, नौकेवर बोरीनदी पार करत गावात साथीच्या आजाराने ग्रासलेले रुग्णाना जिल्हा परिषद शाळेत २४१ नागरिकांची व १६४ पशुधनाची आरोग्य तपासणी करून उपचार देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी धीर सोडू नये, पूर ओसरे पर्यंत गावातच सर्व सेवा देऊ, पुरच्या पाण्यात उतरून धोका पत्करू नका असे आश्वासन ही ग्रामस्थांना प्रांत अधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले.

यात मारवड व अमळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. दिनेश पाटील डॉ. असलम, डॉ. स्वप्निल एस देशमुख, आरोग्य सेवक दिपक पाटील, पगारे, यानी स्त्री पुरुष व बालकांची सायंकाळी उशीरापर्यंत तपासणी सुरु होती. यात आशावर्क, अंगणवाडी सेविकांचीही मदत लाभली. आरुषी सुरेश भिल (वय १३ वर्षे) चार दिवसापासून तापाने फनफनत होती. बोरी नदीला पूर आल्याने साहजिकच तिला घेऊन तिचा कुटुंबाला नदी ओलांडून जीवावर बेतले. तरीही पोहणाऱ्या युवकांनी धाडस करत ट्यूबवर खाट ठेवून आरुषी सह आईला बसवून नदी पार करतांनाच आईच्या मांडीवर तिने प्राण सोडले. या घटनेने समाजमन सुन्न झाले होते. ग्रामस्थांनी मृतदेह थेट प्रांत कार्यालयात नेऊन ठेवत तुम्हीच सांगा आता प्रेत नदीपार करून कसे न्यावे, असा प्रश्न उपस्थित केला होता.

एसडीआरएफची टीम तैनात
एसडीआरएफच्या टीममध्ये पीएसआय शिवजी सोनवणे, प्रशांत राठोड व मेजर सोनल चौधरी व ३४ अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले, पशुवैद्यकीय टीममध्ये डॉक्टर मुकेश पाटील, डॉक्टर व्ही ए धनगर, सतीश सोनवणे, सुहास चौधरी, शुभम साळुंखे व महसूल विभागाचे वाल्मिक पाटील, एन पी भावसार, संदीप पाटील, मुकेश शिसोदे, विश्वास कोळी यांच्यासह मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने, मुकेश साळुंखे, फिरोज बागवान, सुनील तेली यांनी मदतकार्यात सहकार्य केले.

२३ वर्षात पुनर्वसन झाले नाही तर विस्थापित कधी होऊ?
पाडळसरे धरण १९९८ पासून सुरू झाले. ७ एप्रिल १९९७ रोजी तेव्हाच अधिसूचना जारी झाली त्यात सात्रीचे १०० टक्के पुनर्वसन प्रस्तावित होते. या काळात फक्त गावासाठी नवीन जागा संपादक करून किरकोळ नागरी सुविधांचा कामाला सुरूवात झाली, मात्र सात्री गावचे गृहसंपादन अजूनही झाले नाही. तर पुनर्वसन कधी होणार? २३ वर्षं झाली तरी सात्रीच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही व नागरिकांचे विस्थापन झाले नाही. सोई सुविधांचा चार महिने अभाव असलेल्या सात्री गावाबाबत आता तरी लोकप्रतिनिधी व निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग येईल का? व सात्री गावचे समस्यांचे ग्रहण, पुनर्वसनाचा गुंता सुटणार का? हा सात्री ग्रामस्थांच्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...