आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या कहरात अनेक कुटुंबांना एकापेक्षा अधिक सदस्यांना गमावण्याची वेळ आली. सगळ्यांसाठीच मानसिक, आर्थिक, भावनिक या सर्वच पातळ्यांवर हा माेठा धक्का हाेता. त्यातून सावरण्याचा आता हे सारे प्रयत्न करताहेत. काेराेनाने घाला घातलेल्या कुटंुबांच्या या वेदना आणि परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी त्यांनी एकवटलेले बळ “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी जाणून घेतले.
“आम्ही स्पोर्ट्समध्ये नाव कमवावं हे आमचंं स्वप्न आई-पप्पांनी त्यांचं स्वप्न मानून साथ दिली, आता त्यांच्या पश्चात हे स्वप्न पूर्ण करायचं आहे,’ आकांक्षा परदेशी सांगत होती. बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरावर धडक मारणारी आकांक्षा, आर्चरीमध्ये राष्ट्रीय स्तरावर झळकलेली दिशा यांच्यासह परदेशी कुटुंबातील सहा मुले हीच आता कुटुंबाची ताकद बनत आहेत. तेरा जणांच्या एकत्र कुटुंबाने गजबजलेले सावद्यातील परदेशींचे कुटुंब या मुलांच्या ताकदीवरच पुन्हा उभं राहू पाहत आहे.
शिवाजी चौकातील परदेशी कुटुंबासाठी कोरोनाचा हल्ला भयावह होता. कुटुंबातील तीन भाऊ, दोन सुना आणि वयोवृद्ध आई अशा तब्बल सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला. रामसिंह परदेशी पानटपरीचा व्यवसाय करीत होते. कैलास परदेशींचा मोटारसायकलच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय होता. सोबतच ते पत्रकारिताही करीत होते. तिसरे बंधू किशोरसिंह यांच्यासह कोरोनाने या कुटुंबातील सहा जणांवर घाला घातला. उपचारासाठी तर पन्नास-साठ लाख रुपये खर्च झाला. कुटुंबाची सारी बचत त्यात खर्ची लागली आणि आता सहा मुलांसह वयस्कर काका-काकूंच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. खरेतर परदेशी कुटुंबावर कोरोनाने आणलेली ही वेळ पायाखालची जमीन हादरवणारी. पण, कुटुंबातील मुलांनीच आता धीराने उभारी घेतली आहे. आकांक्षा, दिशा आणि पृथ्वीराजने सारे दु:ख बाजूला सारून पुढील स्पर्धांसाठी आपला सराव सुरू केला आहे. तर शुभांगीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केलाय तर उमेशने कामाला सुरुवात केली आहे.
एकत्र कुटुंब म्हणून एकमेकांना साथ देण्याची ताकद या प्रसंगात उपयोगी ठरल्याचे ही मुले सांगतात. एकत्र कुटुंबात मिळालेल्या ताकदीमुळेच एवढ्या दु:खाच्या वादळात पुन्हा उभे राहू शकल्याचे त्यांना वाटतंय. अर्थात, पुढची वाट सहज नाही याचीही त्यांना कल्पना आहे. शिक्षण आणि खेळ यासाठी मदतीचा हात मिळाला तर ही लढाई थोडी सोपी होईल अशी त्यांना आशा आहे. अर्थात, त्या मदतीची वाट बघत हातावर हात ठेवून न बसता आपल्या दिवंगत पालकांचे स्वप्न साकार करण्यासाठी ही मुलं नव्या उमेदीने मैदानात उतरली आहेत. आता वेळ आहे समाजाची, परदेशी कुटुंबातील या मुलांच्या पाठीशी उभे रहाण्याची.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.