आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा एक टक्क्याच्या आत आहे. जिल्हा प्रशासन कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांवर गेल्यास किंवा त्यापूर्वीही कोरोना संसर्गाचा धोका वाढल्यास शाळा बंद करण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्यातील शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवताना जिल्ह्यातील पालकांत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ही लाट राज्यात पसरण्याचा धोका आहे. ती किती दिवसांत इतर जिल्ह्यांमध्ये पोहोचते, त्यावर शाळा बंद करण्याचा निर्णय अवलंबून आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांमधील शिक्षण व परीक्षांबाबतच्या तयारीबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.
या बैठकीला जिल्ह्यातून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन व जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते. उच्च तंत्र शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरू व जिल्हाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. विद्यापीठ ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण व परीक्षा घेऊ शकते. सातपुडा पर्वतरांगांमुळे नंदुरबार जिल्ह्यात कनेक्टिव्हिटीची अडचण येत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
तूर्तास शाळा बंद करण्याचा निर्णय नाही : दहा दिवसांत जिल्ह्यात शून्य, दोन, तीन, नऊ, सोमवारी १६ व मंगळवारी १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून आली. एखाद्या ठिकाणावरून जास्त प्रमाणात रुग्ण येत असल्यास, पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांवर गेल्यास शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यापूर्वीही कोरोनाचा धोका वाढल्यास शाळा बंद करण्याचा विचार करण्यात येईल. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्याच्या खाली आहे. त्यामुळे तूर्तास शाळा बंद होणार नाहीत, असे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
मनपाच्या कोविड सेंटरमध्ये दोन दिवसांत व्यवस्था करा
जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा ५०च्या पुढे गेला आहे. त्यामुळे कोविड सेंटरची पाहणी करून दोन दिवसांत संपूर्ण व्यवस्था करून सज्ज ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी दिले. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा व विद्युत विभागाची बैठक त्यांनी घेतली. दुसऱ्या लाटेत महापालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटरची दोन दिवसांत पाहणी करावी असे आदेश देण्यात आले आहेत. सर्व विभागांकडून तयारी करून घेण्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त श्याम गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या अनुषंगाने यंत्रणा कामाला लागली.
सक्रिय रुग्णसंख्या अर्धशतकाच्या पार
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन आकडी रुग्णसंख्या आढळून आल्याने कोरोना रुग्णसंख्येने अर्धशतकाचा टप्पा ओलांडला. मंगळवारी १३ नवीन बाधित समोर आले. सर्वाधिक पाच रुग्ण जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यात सध्या ९ रुग्ण लक्षणे असलेले आहेत. दोन रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. जळगाव शहरात आढळून आलेल्या रुग्णांत ओंकारनगर, दादावाडी परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ५२ झाली असून, यात ४३ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत तर ९ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत.
ग्रामीण भागात चाचण्या वाढवा : ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली असून, बाधितांच्या संपर्कात आलेल्या २० व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता या तपासण्या वाढवण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिल्या असून, याद्वारे लवकर कोरोनाचे निदान होऊ शकेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
तपासणी करण्याचे आवाहन : वाढती रुग्णसंख्या पाहता मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करणे आवश्यक आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. बाहेरगावाहून आलेल्या व कोरोनाची लक्षणे असलेल्या, बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.