आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑक्टोबरपर्यंत लांबलेला आणि सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस, वादळ-वाऱ्यांसारख्या नैसर्गिक आपत्तीसह रोगराईने यंदाच्या हंगामात शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली; परंतु प्रमुख शेतमालाला सध्या उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. कापूस, मका, सोयाबीन आणि सूर्यफुल या शेतमालाला बाजारपेठेत हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. जागतिक बाजारात या प्रमुख चारही शेतमालाचे उत्पादन कमी झाले आहे. टंचाईमुळे निर्यातीची संधी असलेल्या या शेतमालाला आतापर्यंतचे विक्रमी दर मिळत आहेत. शेतकऱ्यांसाठी ही समाधानाची बाब आहे.
कापूस दहा हजारी....
आतापर्यंत ६ हजारांच्या भावाचा उच्चांक गाठलेल्या कापसाचे दर प्रतिक्विंटल १० हजार ५०० रूपये ते ११ हजारांवर गेले आहेत. कापसाच्या जागतीक बाजारातील हा आतापर्यंतचा विक्रम मानला जात आहे. कापसाचे उत्पादन ३० टक्यापेक्षाही अधिक घटले आहे. अशा स्थितीमध्ये कापसाला मिळालेली दरवाढ ही शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यास पूरक ठरली आहे. चांगल्या दरामुळे येत्या हंगामात कापसाचे कमी झालेले क्षेत्र सरासरीपर्यंत वाढेल. जिल्ह्यात किमान ५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड अपेक्षीत आहे.
मक्यावर लष्करी अळीचा ओढवला प्रादुर्भाव
गेल्या चार वर्षात नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलेल्या मक्यावर अलीकडे लष्करी अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे उत्पादन घटले असतांना बाजारात हमीभावापेक्षाही मक्याचे दर कमी होते. गेल्या वर्षात ९५० पासून तर १७०० रूपयांपर्यंत मक्याला प्रतिक्विंटल दर मिळाले होते; मात्र गेल्या तीन महिन्यात मक्याचे दर वाढले आहेत. सध्या मका २२०० रूपये ते २३५५० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
सूर्यफूल घेणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी
रब्बी हंगामात सर्वाधिक कमी उत्पादन खर्च असलेल्या सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांचा ओढा होता. यंदा जिल्ह्यात सूर्यफुलाचे क्षेत्र प्रचंड वाढले. रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाची आयात थांबल्याने देशांतर्गत बाजारात सूर्यफुलाचे दर कमालीचे वाढले. सूर्यफुल प्रतिक्विंटल ७००० रूपये ते ७३०० रूपये दराने खरेदी केले जात आहे. या दरामुळे शेतकऱ्यांचे समाधान आहे.
सोयाबीनमध्ये आगामी काळात तेजीचा अंदाज
युरोपातील युद्धस्थिती, जागतीक बाजारात सोयाबीनचे उत्पादन घटले, चीनमध्ये सोयाबीनची टंचाई निर्माण झाल्याने जगभरातून सोयाबीनची विचारणा होत आहे. भारतामध्ये सोयाबीनचे उत्पादन घटल्याने टंचाई निर्माण होऊन भाव वाढ झाली आहे. येत्या खरिपाच्या तोंडावर मे आणि जून महिन्यात ही दरवाढ उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल ६८०० ते ७३०० रूपये दर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.