आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पीडपोस्ट:वॉटरप्रूफ लिफाफ्यांतून विदेशात पाठवा राख्या ; भावाला राखी पाठवण्यात या महिला आघाडीवर

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ७६ पोस्टांतून दीड हजार वॉटरप्रूफ लिफाफ्यांद्वारे देश-विदेशात बहिणी आपल्या भावांसाठी राख्या पाठवणार आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. साधे लिफाफे भिजून राख्यांचे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ लिफाफ्यांना प्राधान्य दिले जाते आहे. गेल्या वर्षी काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे पाेस्टाने राख्या पाठवण्याचे प्रमाण ताेकडे हाेते. यंदा मात्र हे चित्र बदलले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यासह विदेशात राखी पाठवण्यासाठी महिलांना पोस्टाचा आधार वाटतो. त्यामुळे महिला देशांत तर राख्या पाठवत आहेतच याचबरोबर विदेशातील आपल्या भावाला राखी पाठवण्यात या महिला आघाडीवर आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातून विदेशात यूएई, टोकियो, कॅनडा, कावासकी, युनियन सिटी, सुसबोटी आदी शहरांत पोस्टाच्या वॉटरप्रूफ लिफाफ्यातून राख्या पाठवण्यात आल्या आहेत. रक्षाबंधन सण जसजसा जवळ येताे आहे, तसतशी पाेस्टातून विदेशात राख्या पाठवण्याच्या संदर्भात विचारणा हाेऊ लागली आहे. पोस्टाच्या माध्यमातूनही सेवा देण्यासाठी विविध पातळीवर जनजागृतीही केली जाते आहे. जास्तीत जास्त लाेकांनी या सेवेचा लाभ घ्यावा म्हणून प्रयत्नही केले जात आहेत.

देश-विदेशातील राखी पाठवण्याचे दर
पोस्टात मिळणाऱ्या वॉटरप्रूफ लिफाफ्याची किंमत १० रुपये आकारली जाते आहे. देशात या लिफाफ्यांतून राखी पाठवण्यासाठी राखी पॅक झाल्यावर २० ग्रॅमपर्यंत १० रुपयांचे तिकीट लावावे लागते. त्या पुढील प्रति २० ग्रॅमला ५ रुपये तिकीट खर्च येतो. तर विदेशात राखी स्पीडपोस्टातून पाठवण्यात येते. अंतरानुसार खर्चाची आकारणी केली जाते.

यंदा राख्यांसाठी कलात्मक लिफाफा
वॉटरप्रूफ लिफाफा कलात्मक डिझाइनद्वारे तयार केला आहे. लिफाफ्यावर ‘हॅपी रक्षाबंधन’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच या लिफाफ्यावर राखीचे चित्रही चितारण्यात आले आहे. जळगाव विभागाला हजार लिफाफे जिल्ह्यात ४२ पोस्टांकडे मागणीनुसार वितरित करण्यात आले आहे.
- बी. व्ही. चव्हाण, पोस्ट अधीक्षक जळगाव

बातम्या आणखी आहेत...