आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:काेराेनाने खंडित अभ्यासक्रमाच्या “सेतू’ला इंग्रजी विषयाचे वावडे! मराठी, गणित अन् परिसर अभ्यास विषयांचाच समावेश

चाळीसगाव / अजय कोतकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षभरात शिक्षणात पडलेला खंड भरून काढण्यासाठी सेतू नावाचा ४५ दिवसांचा ब्रिज कोर्स राज्यभरातील शाळांमध्ये सुरू आहे. मात्र त्यात इंग्रजी विषयाचा समावेशच नाही. फक्त मराठी, गणित व परिसर अभ्यास हे विषय आहेत. इंग्रजी विषय महत्त्वाचा असताना त्याचा कसा काय विसर पडला, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

सेतू अभ्यासक्रम केवळ मराठी व उर्दू माध्यमासाठीच तयार केला आहे. हिंदी, इंग्रजी व इतर भाषांमधील मुलांसाठी ब्रिज कोर्स तयार करण्यात आला नाही. त्यांना सेतू अभ्यासक्रमाची गरज नव्हती का? एससीआरटीकडे (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे) मनुष्यबळाची की इच्छाशक्तीची कमी होती? मराठी शाळा या मोठ्या प्रमाणावर सेमी इंग्रजी झालेल्या आहेत, याचीही माहिती शिक्षण विभागाकडे नव्हती का? आज निम्मे दिवस संपल्यानंतर सेमी इंग्रजीच्या मुलांना पीडीएफ फाईल्स पाठवल्या गेल्या आहेत.

रोज सहा विषयांच्या सहा कृतिपत्रिका : रोज सहा विषयांच्या सहा कृतिपत्रिका मुलांनी सोडवायच्या आहेत. यासाठी शिक्षकांसह, पालक अथवा अन्य सहाध्यायांची मदत घ्यावयाची आहे. शिवाय ऑनलाईन क्लासही करायचे आहेत. याला कंटाळून जूनमध्ये वाढलेली विद्यार्थी संख्या जुलैमध्ये रोडावली आहे.

सेतू अभ्यास म्हणजे काय? : सेतू अभ्यास म्हणजे मागील वर्गांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित तयार केलेला व विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आलेला अभ्यास म्हणजे सेतू अभ्यास होय.

काय आहे कृतिपत्रिका?
कृतिपत्रिका म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला विषयनिहाय प्रश्नपत्रिका असते. त्यामध्ये प्रत्येक विषयाचे १० ते १५ कृतियुक्त प्रश्न असतात. ते विद्यार्थ्यांनी सोडवणे याला कृतिपत्रिका म्हणतात. यामध्ये ३ चाचण्या १५-१५ दिवसांनी घेतल्या जाणार आहेत. हा अभ्यासक्रम एससीईआरटी म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी तयार केलेला आहे.

या येत आहेत अडचणी
जे विद्यार्थी ऑफलाइन आहेत त्यांच्यापर्यंत सेतू अभ्यासक्रम पोचवायचा कसा? सध्या शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के असताना ४५ दिवसांत सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेणे कसे शक्य आहे.

इंग्रजी व सेमी इंग्रजीचे काय?
मराठी आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम आहे, तर इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे काय, असा दुजाभाव कशासाठी, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...